रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी
जागतिक रेडियो दिन
(१३ नोव्हेंबर)
रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी
# यावर्षीची थीम 'नवं जग, नवा रेडिओ'
# विसोरा येथे ६० वर्षांपूर्वी आले पहिले रेडिओ
# उद्धव परशुरामकर यांनी आणला रेडिओ
विसोरा : दि. १२ (अतुल बुराडे)
एक वेळ अशी होती जेव्हा रेडिओ मानवी जीवनाचा खूप महत्वाचा भाग होता. माहिती आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजन म्हणून रेडिओकडे पाहिल्या जात होते. मात्र टीव्ही, संगणक, मोबाईल आणि त्यावरचे अनेकानेक मनोरंजक साधने अवतरल्याने रेडिओचा आधीसारखा वापर होत नसला तरी रेडिओचे महत्व कमी झालेले नाही. आजपासून तब्बल ६० वर्षांपूर्वी घनदाट अरण्यपट्ट्यात वसलेल्या तेव्हाच्या विसोरा गावात रेडिओसारख्या प्रसारमाध्यमाचे असणे श्रीमंतीचे सोबतच कुतूहल आणि औत्सुक्याचे होते. विसोरा येथे १९व्या शतकाच्या सहाव्या दशकात रेडिओ दाखल झाले. गेल्या साठ वर्षांत अनेकानेक तंत्र-विज्ञान बदलल्याने पूर्वीसारखे रेडिओचे बॉक्स आता दिसेनासे झालेत.
सन १९६० च्या दरम्यान विसोरा येथील प्रतिष्ठित नागरिक उद्धव परशुरामकर यांनी चंद्रपूर येथून आरसीए कंपनीचा रेडिओ विकत घेऊन आणला. हे रेडिओ बॅटरीवर चालणारी होते. रेडिओची किंमत मात्र कळू शकली नाही. या रेडिओवर नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम ऐकले जात होते. विशेष बाब म्हणजे आजपासून तब्बल ६० वर्षांपूर्वी विसोरात जेव्हा पहिली रेडिओ आली तेव्हा गावात वीज सुद्धा आलेली नव्हती. सन १९६४ ला विसोरात प्रथमच वीज आली. रेडिओ दाखल झाली त्यासमयी गावामध्ये टीव्हीचा पत्ता नव्हता. म्हणजेच परशुरामकर यांनी आणलेला रेडिओ विसोरातला पहिलावहिला प्रसारमाध्यम होता. त्यामुळे रेडिओची प्रचंड क्रेझ होती. गावामध्ये रेडिओ ऐकण्यास सकाळपासून वीस-पंचवीस लोकांची सतत गर्दी असायची अशी माहिती मिळाली.
त्यानंतर फिलिप्स, मॉर्फि, नेल्को या कंपनीच्या रेडिओ विसोरा येथे आणल्या गेल्या. रेडिओ आगमनाच्या पूर्वी गावातील कुणी शहराच्या ठिकाणी शिकत असेल वा जात असेल तो व्यक्ती किंवा बाहेरून नवे कुणी गावात आल्यावर वाचून ऐकुन देशातील, जगातील घटनांची माहिती देत असे. तेव्हा रेडिओच्या बॉक्समधून आवाज ऐकू येणे हे आश्चर्यच होते. लोकांना फार फार आकर्षण आणि अचंबा वाटत असे. म्हणूनच रेडिओ ऐकण्यास लोकांची गर्दी व्हायची. विसोरा येथील काही धनाढ्य लोक नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा अशा शहरांत नेहमी जात त्यामुळे त्यांना बाजारात येणाऱ्या नवनव्या वस्तूंची माहिती व्हायची आणि ते खरेदी करीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा