मायबोलीचे कलाविष्कार झुलवे झाले लुप्त

मराठी राजभाषा गौरव दिन
(२७ फेब्रुवारी)

मायबोलीेचे संवर्धन करणारे झूलवे झाले लुप्त

👉 झूलवे म्हणजे झाडीबोलीचे एक भाषा सौंदर्य
👉 होळी, लग्नसोहळ्यात गायले जायचे झूलवे
👉 ग्रामीण पुरुष, महिला गातात झूलवे
👉 झूलव्यांमधून व्यक्त होते प्रेम, समर्पण
👉 नवमाध्यमांच्या गर्दीत लोकगीते होताहेत विरळ

             फाल्गुन पौर्णिमेला, मराठी वर्षांतील अगदी शेवटचा सण होळी साजरा केला जातो. नव्याची सुरुवात करण्यासाठी चुकीचे आणि वाईट ते सारेच सोडून नवनिर्मितीचा ध्यास घेण्याचा हा दिवस. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी खेड्यात होळी सणाला एक वेगळाच माहौल असायचा ज्यात झूलवे गायले जायचे. तसेच हरएक व्यक्तीच्या जीवनातील हवाहवासा वाटणारा अशा विवाह सोहळ्यात सुद्धा झुलवे गायले जायचे. निव्वळ प्रथा, परंपरा म्हणून सण-उत्सव साजरे करण्याचा हेतू नसतो. तर त्यातून आपसूकच मायबोलीचे संवर्धन आणि प्रसार सुद्धा होत असतो. आपल्या बोलीत एकमेकांप्रती असलेला प्रेम, लोभ, विनोद आणि राग पण व्यक्त करण्याच्या काव्यांना (लोकगीते) झूलवे म्हणतात. बदलत्या काळात लग्नातील आणि होळीचे झूलवे लुप्त होण्याच्या मार्गावर असून त्यांचे लेखन, ध्वनिमुद्रण करून जतन करण्याची नितांत गरज आहे. विशेष म्हणजे झुलवे हे झाडीबोली मराठी बोलीभाषेतील उत्कृष्ट कलाविष्कार असून भाषेचे सौंदर्य प्रदर्शित करतात. आज जागतिक मराठी भाषा गौरव दिन त्यानिमित्त झाडिबोली मराठी भाषेतील झूलव्यांचे ग्रामीण खेड्यापाड्यातल्या भाषाप्रेमींकडून घेतलेला हा गोड आढावा.
            शब्दांतून भावना व्यक्त करण्यासाठी भाषा हि उत्कृष्ट असे माध्यम आणि संगीणी आहे. पण व्यक्त होऊ पाहणाऱ्या शब्दांना हवा तो साज आणि बाज देता येतो. आजपासून वीस-पंचवीस वर्षांपूर्वी लग्न समारंभात वर वधूला घेऊन जातांना आजच्या सारखे बँड वा डीजे नव्हते. तेव्हा एखादा व्यक्ती घोड्याची प्रतिकृती ढोलकिच्या तालावर नाचवत असे. तेव्हा नवरदेव वा त्याच्या नातेवाईक यांच्याप्रती असलेल्या प्रेम, राग, लोभ अशा भावना एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्यक्त केल्या जात. स्त्री-पुरुष कुणीही अस्सल झाडीबोलीत आपल्या आवाजात स्वरचित आणि स्वनिर्मित अशा काव्यमय भावछटा तालासूरात सर्वांसमोर एकमेकांना उद्देशून म्हणत असत. वरातीच्या वेळेस वा लग्न मंडपात एखादा विधी सुरू असतांना झुलवे म्हणत. ह्याच त्या झूलवा. झूलव्यांची एकडुन तिकडून बरसात होऊ लागताच जुगलबंदी चांगलीच रंगतदार व्हायची असे जुने जाणकार सांगतात. झूलवामधून ज्याला उद्देशून झुलवे म्हटल्या जात त्याचा बद्दलचा प्रेम दिसून येत असे. त्या झूलव्यांमध्ये व्यक्तीचे नाव, स्थळ, त्या-त्या प्रसंगी असलेल्या विशेष वस्तूंचा उल्लेख आवर्जून केला जात होता.
            होळीच्या सणाला गावात ढोलक वाजवत गावातील काही मंडळी मिरवणूक काढत ज्याला बोलीभाषेत फागवा म्हणतात. या फागव्याच्या वेळेस झुलवे म्हटले जात. झुलवे हां काय प्रकार हे सुद्धा अनेकांना आज माहीत नाही. यावरून झुलवे लुप्त होत असल्याचे दिसते. पूर्वी लग्न आणि होळी या विशेष दिवशी गावातील नेमलेल्या खास व्यक्ती ढोलकिच्या तालावर झुलवे सादर करत. विसोरा, शंकरपुर, डोंगरमेंढा, कसारी, एकलपूर येथील अनेक लोकांशी संवाद साधला असता झूलव्यांबद्दल माहिती मिळाली.
            आयुष्यात कधीच शाळेचा उंबरठा न ओलांडता सुद्धा आपल्या बोली भाषेत स्वरचित अशा झूलवा अनेक ग्रामीण महिला-पुरुष गातात. इथे लिहता-वाचता न येताही मनातल्या मनात झुलवे रचले जात असत. विशेष म्हणजे त्या-त्या प्रसंगी त्यावेळी अगदी सुयोग्य, समर्पक होणाऱ्या शीग्र काव्याचा आविष्कार व्हायचा. यातून औपचारिक शिक्षण घेऊनच उत्तम शब्द ज्ञान मिळतो आणि काव्य रचना, सादरीकरण आणि समयसूचकता कळते हे खोटे ठरते. जीवन जगतांना अनौपचारिक अशा बिनभिंतिच्या जीवनाच्या शाळेतून सुद्धा शब्द भांडार वाढतो, जीवनानुभव खूप काही शिकवतो तसेच पाहून, ऐकून, बोलून आपणास शब्दांची अनोखी किमया साधता येते. हेच यातून स्पष्ट होते.
            आदिवासी (गोंड) समाजात लग्न सोहळा हा प्रथा-परंपरांचा उत्सव असतो. लग्नाआधीच्या दिवशी होणाऱ्या मंडप पूजनाकरिता तयार केल्या जाणाऱ्या मांडव प्रसंगी झूलवे म्हणण्याची प्रथा आहे,
त्यातील एका प्रसंगांना उद्देशून..
            नवा डेरीका मंडवा बनाया,
            मंडवा उपर जांभरुन के डार,
            अरे आ गयी छोकरी ले गया छोकरा,
            मंडवा पडे सुनसान,
    अशा प्रकारचा गोंडी भाषेतील झुलवा म्हटल्या जातो. ज्यामध्ये नव्या डेरी (लाकडी खांब) आणून मांडव बनविण्यात आला आणि त्या मांडवाच्या वरती जांभूळ झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. त्याचवेळी विवाहाच्या वेळी नवरी मुलगी आली आणि मुलाला घेऊन गेली त्यामुळे मांडव सुनसान झाले आहे. असे अगदी मार्मिक वर्णन केले आहे. (गोंड समाजात लग्नकार्य मुलाच्या घरी आयोजीत केलेला असतो.)
    गोंड समाजामध्ये लग्न या मंगल प्रसंगी वधूच्या घरी अंगणातील ज्या मांडवात लग्न असतो त्या मांडवाच्या मध्यभागी नक्षीकाम काम केलेला रंगीत लाकडी खांब (मुंडा) जमिनीत गाडतात. (या खांबाला लग्न कार्यात विशेष महत्व असतो.) अशाप्रसंगी
       वाजा न वाजते, गज न गजते, हा बाळ कुणाचा
      हा बाळ कुणाचा (आडनाव) राजाचा, बाळ ना उजवते,
       बाळ ना उजवते, (आडनाव) राजाचा
       पाटावर बसली, पितांबर नेसली कन्या कुणाची,
       ही कन्या कुणाची (आडनाव) राजाची, कन्या ना उजवते.
   हा झूलवा म्हणतात. यात ज्या दोन घराण्यांमध्ये लग्न होणार असतो त्या-त्या (वर आणि वधू) दोन्ही आडनावांचा उल्लेख असतो. नवऱ्या मुलास वडिलांच्या नजरेत बाळाची उपमा देऊन लग्न संपन्न होऊ पाहत आहे. तसेच पितांबर (पीवळी) साडी नेसून पाटावर बसलेली नवरी मुलगी कुणाची असा प्रतिप्रश्न करून परत आडनाव सांगून तिच्या वडिलांना राजाची उपमा दिली आहे.
   ढोल वाजवत नवरी मुलीला नवरदेव मंडपात घरी आणतात. आणि तो उत्कंठावर्धक आणि आनंददायी क्षण येऊन ठेपतो ज्याची सारेच आतुरतेने वाट पाहत असतात. ज्या क्षणी लग्न लागत असतो त्याप्रसंगी
          सिंधिच्या बाशिंगाला,
          सिंधिच्या बाशिंगाला
          सूताचा येळा पळला,
          सूताचा येळा पळला
          विष्णू-ब्रम्हदेव जोडा पाळलणं.
   हा अत्यंत महत्वाचा झूलवा आवर्जून म्हटल्याच जातो. वर-वधू यांच्या डोक्यावरील बाशिंगाभोवती सूताचा वेढा घातलेला असतो. आणि लग्नमंडपात जणूकाही विष्णू-ब्रम्हदेव यांनीच वधू-वरांची गाठ बांधून जोडा तयार केला आहे, असा भाव व्यक्त झालेला दिसून येतो.
                       गोंड, प्रधान, ढिवर याच नव्हे कुणबी सारख्या इतरही अनेक सामजातील लग्न प्रसंगी झुलवे म्हटले जात. आज मनोरंजन करणारी बहुरंगी अनेकानेक नवसमाजमाध्यमे अवतरल्याने सण, उत्सव, समारंभ, शुभदिनी, विशेष दिवशी लोकांकडून लोकांच्या मनोरंजनासाठी सादरी केली जाणारी लोकमान्य अस्सल गीते लुप्त होत आहेत. या लोकगीतांचा संग्रह असणारी पिढी आता या जगातून कायमची निघून जात आहे. मात्र अशावेळी नव्या पिढीने त्या प्रथा-परंपरा आणि लोकगीते यांच्याकडे पाठ दाखविल्याने नव्या पिढीतील लोकांना लोकगीते पाठांतर झालेले नाहीत. तेव्हा हा अनमोल असा ठेवा संग्रही ठेवणे हि काळाची गरज आहे. आजच्या जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी