कोवळ्या हृदयांना जुळविण्यात मोबाईल ठरतोय किंगमेकर

 व्हेलेंटाईन डे

(१४ फेब्रुवारी)

कोवळ्या हृदयांना जुळविण्यात मोबाईल ठरतोय किंगमेकर

# ग्रामीण भागातही व्हेलेंटाईन डेची हवा 

# मोबाईलमुळे जवळीकता साधण्यास मदत

# सोशल मिडिया मंचावर प्रेमभावनांची शेअरिंग

# आता स्क्रीन टु स्क्रीन गुलाबी फुलांची देवाणघेवाण

# मागे पडली कागदी चिठ्ठ्यांची क्रेझ

                 प्रेम म्हणजे मन आणि हृदयाला आनंद देणारी कोमलतम भावना. दोन जीवांना एकमेकांकडे आकर्षित करणारी मनोभावना. पुर्वीचे असो कि आताचे प्रेम म्हणजे प्रेम प्रेमच असले तरी व्यक्त होण्याच्या पद्धती अनेक पटीने बदलल्या. आधी आवड, आकर्षण, प्रेम वाटले तरी हृदयातल्या नाजूक भावना ओठांवर वा कागदांवर येऊन बाहेर पडणे अशक्यप्राय वा अनेक दिवस लागत. आता मात्र प्रेमभावना मनात निर्माण झाली काय लगेच मोबाईलच्या माध्यमातून फोन, शब्द, ईमोजी (चिन्ह) मधून व्यक्त केल्या जाते. इतके सहज सोपे प्रेम व्यक्त करणे झाले आहे. याकामी मोबाईल किंगमेकर ठरलाय. काही वर्षांपूर्वीपर्यंत महानगरांमध्येच सीमित असलेल्या व्हेलेंटाईन दिनाने आता खेड्यातल्या हृदयात प्रवेश केला असून शालेय वा महाविद्यालयीन मुलेमुली मोठ्या उत्साहात व्हेलेंटाईन डे साजरा करतांना दिसतात.

                 मोबाईलने अगदी सामान्यांच्या जीवनात सहज-सुलभपणे प्रवेश करण्यास एकविसावे शतक उजाडले. मोबाईल क्रांतीने मानवी भावभावना पण मोबाईलसारख्या वेगवान झाल्या आहेत. आजपासून वीस वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात सामाजिक रुढी, परंपरा अशा रुढावल्या होत्या कि शाळकरी वा कॉलेज वयात असलेल्या मुलगा वा मुलगी यांना भिन्नलिंगी आवडल्यास किंवा त्याच्यावर प्रेम जडल्यास ते मनातच दाबून ठेवावे लागत असे. यदाकदाचित ते व्यक्त झालेच किंवा बाहेरच्या कुणाला असो कि घरच्यांना माहीत झाले तर त्यांच्याकडे कुटुंबातील सदस्यांचा आणि समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन पार बदलून जात असे. परिणामी त्यांना प्रचंड मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागायचा. त्यात त्या दोन जीवांच्या कोवळ्या भावना दूरच राहिल्या. इथे आपल्याला कुणी आवडते आणि प्रेम आहे हे कळविण्यासाठी जवळचा खास मित्र, मैत्रीण अन्यथा कागदाची चिठ्ठी हेच संदेशवाहक म्हणून भूमिका वठवत. यामध्ये प्रेम संदेशाची गुप्तता (अदृश्यता) असण्याची, राखण्याची शक्यता फार कमी होती. अशावेळी संदेशवाहक हाच खरा किंगमेकर ठरत असे.

         आजही प्रेमाबद्दलच्या समाजाच्या रुढी आणि परंपरा पूर्णतः बदललेल्या नाहीत. मात्र आधीचे कठोर समाजमन आज लवचिक होऊ पाहत आहे. कुणाचे कुणावर प्रेम आहे. हे व्यक्त करण्यासाठी आता मानवी संदेशवाहकाची मुळात गरजच उरलेली नाही. आता ती जागा घेतली आहे मोबाईलने. मोबाईलमुळे अगदी शाळकरी ते कॉलेजचे मुले-मुली बिनधास्तपणे भावनांची देवाणघेवाण करतात. मोबाईल टु मोबाईल कॉलकरून संवाद साधत तसेच मोबाईलमधल्या समाज माध्यमांतून शब्द, इमोजीरुपी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. आणि हे सारे केल्यावर डिलीट करताच टाईप करून पाठवलेले संदेश अदृश्य होऊन जाते. एकूणच लपूनछपून का असेना पण आपल्या भावना थेट त्याच व्यक्तीपर्यंत अगदी क्षणार्धात पोचतात. होकार-नकार काही का असेना परंतु प्रेमाचा फैसला ऑनस्क्रीन होऊन जातो. याहून वेगळे प्रेमानंद वा प्रेमभंग वर्तमानात नाही. हे सगळे शहरी तसेच ग्रामीण भागातही घडतेय हे कुणीही नाकारू शकत नाही. यंदा तर कोरोनाच्या साथीने अर्धे अधिक शैक्षणिक वर्षे घरीच गेले. त्यात ऑनलाईन शिक्षणाचा फंडा समोर आल्याने अनेक शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाईल खरेदी केला. अशावेळी त्या मोबाईलच्या वापरातून काहींना व्हेलेंटाईनचा शोध लागून त्यात ते व्यस्त नसतील कशावरून?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी