हरपली विसोराच्या बैलांच्या जंगी शंकरपटाची मजा
हरपली विसोराच्या बैलांच्या जंगी शंकरपटाची मजा
# विसोराची अनोखी शतकोत्तर परंपरा
# संक्रांतीनंतरच्या तिसऱ्या गुरुवारी आधी शंकरपट आता मंडई मात्र यंदा पडला खंड
# विसोरातील शंकरपटाचा झाडीपट्टीत होता माहौल
# शंकरपट बंदीमुळे पट शौकीनांचा हिरमोड
# दंडार, नाटक प्रयोगांची वैभवशाली परंपरा
# कलाकारांना राजाश्रय देऊन व्हायचे दंडार, नाटक प्रयोग
# अनेक नामवंत कलावंत आले विसोरात
अतुल बुराडे : विसोरा, दि. ३
लोकरंजन, मनोरंजन आणि स्वकीयांच्या भेटीगाठीतून लग्नगाठी या उदात्त हेतूने झाडीपट्टीत पूर्वी शंकरपट आता मंडई आणि दंडार, नाटक यांचा लोकोत्सव भरतो. झाडीपट्टी रंगभूमीला सजवतांना ज्या गावांनी जणू माहेरचा वाटा उचलला त्यात विसोरा गावाचा आवर्जून नामोल्लेख करावा लागतो. संक्रांतीनंतरच्या तिसऱ्या गुरुवारी होणाऱ्या विसोराच्या शंकरपट आणि दंडार, नाटकांना शंभरहून जास्त वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. मात्र गेल्या पाच-दहा वर्षांपासून शंकरपट बंद झाली आणि झाडीपट्टीतल्या विसोराच्या शंकरपटाची मजा हरपली. आता मंडई आणि नाटकांच्या माध्यमातून ही प्रथा टिकवली जात आहे. परंतु यंदा कोरोनाच्या भीतीने विसोरावासियांनी मंडई आणि नाटक आयोजित न करण्याचा निर्णय घेतल्याने शतकोत्तर परंपरा खंडित झाली आहे.
याबाबत विसोरा रहिवासी माजी न्यायाधीश तथा नाट्यकलावंत ज्ञानदेव परशुरामकर, कातकर पुंडलिक नेवारे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. पहिल्याप्रथम, विसोराच्या सांस्कृतिक वैभवाला सर्वधर्मसमभावाचा गडद स्पर्श असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शंकरपटासाठी महिनाभर पूर्वीपासूनच लगबग आणि तयारी सुरू व्हायची. याकामी विशिष्ट पुरुष नेमलेले असायचे. पटाची दान तयार करणे, सीमा आखणे, सिग्नल बनवून जमिनीत उभा करणे ते शंकरपट संपेपर्यंत घाटमास्टर, सिग्नलमास्टर डोळ्यात तेल घालून काम करत.
बैल शर्यतीसाठी आलेल्या बैल जोड्या आणि बैल मालक आणि सोबतचे डझनभर माणसे असा लवाजमा दाखल होत असे. विसोराची शंकरपट म्हणजे झाडीपट्टीत सूदूर प्रसिद्ध त्यामुळे गावात तोबा गर्दी. बैल शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी पूर्वी पैसे आकारले जात नसत पुढे काही रुपये आकारुन प्रवेश होत असे. दोन दानीवर बैलजोड्या जुंपलेले दोन शेकडे धावत. आधी जिकडुन बैल जोड्या सुटत तिकडे घंटा वाजवून शर्यत सुरू होई. आणि जिथे शर्यत संपत असे तिथे दोन्ही बाजूला दोन माणसे झेंडी बांधलेले बांबू धरून उभे असत. बैलांची शर्यत जिंकल्यास पारितोषिक म्हणून यातली एक झेंडी विजेत्याला देऊन गौरव केला जात असे. त्याकाळी या झेंडीला खूप खूप महत्व आणि मान होता. असे जूणेजाणते शंकरपट हौशी सांगतात. नंतर बक्षीस म्हणून मेंथॉल बत्ती, झुली, भांडे या भेटवस्तू देण्यात येत असे. आणि बैल जोडी जिंकताच गोपाळ बांधव ढोलकी वाजवून जिंकलेल्या बैलजोडीचे स्वागत करीत.
शंकरपट निमित्याने विसोरात लोकांची प्रचंड गर्दी राहत असल्यामुळे दिवसा आधी शंकरपट, आता मंडई आणि रात्री नाटकांची मेजवानी राहते. शंभरवर्षेआधी उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करून गावातीलच कलावंत सामूहिकरित्या एक-दोन महिने तालीम करून दंडार करत. काळ बदलल्याने दंडारची जागा नाटकांनी घेतली. विशेष म्हणजे एकाच रात्री सहा ते आठ नाटकांचे आयोजन केले जाते.
झाडीच्या पट्ट्यात विसोरा येथील बैल शर्यत आणि नाटक पाहण्यासाठी पाहुणे, सोयरे, मित्रमंडळी हमखास दाखल होत. घरोघरी पाहुणेच पाहुणे. त्यामुळे त्यांच्या खानपान आणि मानपान करिता घरचा कर्ता आणि महिला मंडळी विशेष काळजी घेतात. येथील नाट्यदर्दी कलावंतांनी नाटक प्रेमापोटी विदेशी पायपेटी, व्हायोलिन, ऑर्गन विकत घेतला जे आजही जपून ठेवले आहेत. झाडीपट्टी रंगभूमीवर दुर्मिळ असा फिरता रंगमंच विसोरा येथे आहे.
शंकरपट बंदीमुळे पट शौकीन नाराज असून बैलावर प्रामाणिकपणे जिवापाड प्रेम करून त्याची पोटच्या पोरासमान काळजी घेत निव्वळ छंद, हौस म्हणून आधी बैलशर्यत होत असे. त्यामुळे अनेकांना रोजगार प्राप्त असे. आता शंकरपट बंद झाल्याने आधीची मजा राहिली नाही. अशी खंत अनेकांनी बोलून दाखवली.
या वर्षी कोरोनाची दाट छाया पुसट होत असतांनाही मनातील भीती कायम आहे. त्यामुळे मंडई आणि नाटके आयोजित करण्यासाठी गावातल्या नागरिकांनी पुढाकार घेतला नाही. यामागे मंडई आणि नाटकांना होणारी गर्दी आणि त्यातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो ही भावना आहे. सांस्कृतिक कार्यक्रम असल्यावर घरोघरी येणारे पाहुणे अनेकानेक गावांतून येतात तेव्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता कुणीच नाकारू शकत नाही. म्हणून विसोराच्या नागरिकांनी यंदा मंडई आणि नाटक आयोजनाला बंगल दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा