बैलबंडीतून वरात काढण्याची प्रथा आता झाली लुप्त

        दोन मानवी जीवांचे मनोमिलन घडवून आणणारा एक सामाजिक उत्सव म्हणजे लग्न. प्रेम या अडीच अक्षरी भावनेला आणखीनच दृढ करणारा अडीच अक्षरी शब्द म्हणजे लग्न ! लग्नात वर-वधू, कुटुंब, सगेसोयरे, शुभचिंतक, वऱ्हाडी या साऱ्यांशिवाय बैलजोडी आणि बैलगाडी यांचीही उपस्थिती अगदी प्रार्थनिय अशीच. याला कारणही तसेच. लग्नाचा केंद्रबिंदू असलेल्या नवरदेव, नवरीच्या वरातीची सारी भिस्त आणि आरास असायची बैलगाडीवर. मात्र मानवी बुद्धी आणि कल्पनेच्या तंत्रयंत्र बळावर अवतरलेल्या चारचाकी वाहनांनी बैलगाडीने निघणारी नवरदेवाची वरात पार पुसट करून टाकली आहे. होय, चारचाकी वाहनांमुळे दोन-तीन दशकांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येकच लग्नाची बैलगाडीतून काढली जाणारी वरातीची प्रथा आज लुप्त होत चालली आहे.

            आजपासून तीसवर्षापूर्वीच्या आधी ग्रामीण भागात अगदी विरळ अशा जनसंख्येने वसलेली खेडी, वनव्याप्त जमीन अधिक, अल्पशिक्षित आणि अशिक्षित तरीही जीवन जगण्याची कला शिकलेले लोक असे चित्र होते. रोजच्या दैनंदिन वा सण-उत्सवाप्रसंगी नैसर्गिकपणा आणि पारंपरिकता जास्त. आधुनिकतेचा गंध गावखेड्यात येण्याआधी हे सारे तसेच सुरू होते. शेती आणि अंगी पिढ्यानपिढ्यापासून चाललेली कला हेच पोटापाण्याचा आधार. त्यामुळे लग्न हा सुद्धा अस्सल नैसर्गिकता, परंपरा जपणारा. दोन ओळखी, अनोळखी मानवी जिवांखेरीज साऱ्यांच्या भेटीगाठीचा अनुपम असा आतूरता आणि उत्सुकतामय सामाजिक सोहळा. 

            लग्न जुळल्यावर वर-वधू आणि सर्वांनाच ओढ असते ती लग्नाची. एकदा लग्नाचा दिवस आला की, उत्कंठा अगदी शिगेला पोहचते. प्रत्येक समाजाच्या प्रथेनुसार लग्न हा वर किंवा वधू माता-पित्याच्या राहत्या घरी असतो. त्यामुळे लग्न होताच वर किंवा वधू आणि त्यांच्याकडील वऱ्हाड वर किंवा वधूच्या घरी आपल्या लवाजम्यासह जातो. हीच लग्नाची वरात. पूर्वी ग्रामीण भागात दुचाकी, चारचाकी वाहने असणे दुर्मिळच. त्यामुळे लग्नाच्या वरातीमधील वर-वधू, वऱ्हाडींना जाण्यायेण्या करिता बैलगाडी, रेंगी, खासर, दमणी हेच एकमेव साधन. वर-वधूंच्या घरी तसेच शेजारी, मोहल्ल्यातील, गावातील तसेच लग्नाला आलेल्या नातलगांच्या मालकीच्या बैलगाड्यांवर वर किंवा वधू आणि लग्नाला आलेले वऱ्हाडी बसून जात वा येत. यात वर किंवा वधू करिता सजवलेली देखणी बैलजोडी आणि बैलगाडी असायची. गावांत कुणाच्या घरी लग्न असले की, लग्नाच्या वरातीत जाण्यासाठी बैलजोडी आणि बैलगाडी असलेल्या घरचे लग्नदिवसाच्या आधीच सर्व तयारी करायचे. ज्या गावी लग्न आहे तो ठिकाण गावापासून नेमका किती मैलावर आहे यावरून आधीच लग्न घरचे आणि लग्नाला जाणारे सारेच नियोजन करायचे. कोण कोण लग्न वरातीला येणार, किती बैलजोड्या लागणार तशी पूर्ण व्यवस्था केली जात असे. मग बैलजोडीला सजवणे, बैलगाडी, खाचर सुव्यवस्थित करणे. आणि लग्न ज्या गावी आहे तिथे जाण्यासाठी किती वेळ लागेल यावरून बैलगाडीवर लग्न वरात निघायची. लग्नाची वरात लग्नघरच्या कुलदैवताची पूजापाठ झाली की त्यानंतर गावातील हनुमान मंदिरात नतमस्तक झाल्यावर निघायची. ही वरात अगदी खास आणि आगळीवेगळी अशी असायची.

            आताच्या चारचाकी वाहनांनी निघणारी लग्न वरातीत तेव्हाची बैलगाडीने निघणाऱ्या वरातीमधील मजा नसल्याचे जाणकार सांगतात. आज वयाची पन्नाशी ओलांडलेल्या बहुतांश जोडप्यांची लग्न वरात बैलगाडीने काढली असल्याचे गावकरी सांगतात. लग्नातील नवरदेव-नवरी यांची वरात जेव्हा निघायची तेव्हा बैलगाड्यांचा ताफा गावातल्या गल्लोगल्ली सजायचा आणि एकदा त्या-त्या बैलगाडीवर वऱ्हाडी बसले की एका लांबच लांब रांगेत लग्नाची वरात निघायची. या वरातीतील प्रत्येकच क्षण अविस्मरणीय असाच असायचा असे बैलगाडीतून वरात गेलेल्या तेव्हाचे वर-वधू, वऱ्हाडी सांगतात. 

           गावखेडे कमी तसेच जंगल खूपच दाट, फक्त रमलेले जंगलातील रस्ते त्यामुळे वन्यप्राण्यांची भीती, चोर, डाकु यांची दहशत पावलोपावली जाणवत असल्याने दाटीवाटीने आणि एकोप्याने वरातीचा प्रवास असायचा. बैलगाडी खराब झाल्यास वा बैलाची तब्येत बिघडल्यास अख्ख्या वरातीतील सर्व वऱ्हाडी एकसंघ होऊन त्यातून मार्ग काढत. वरातीच्या मार्गात बैलांना तहान लागल्यास वाटेत पडणाऱ्या तलाव, बोड्या मधील पाणी पाजले जात असे. पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत लग्नगावी वरात न पोहचल्यास वाटेतील एखाद्या गावांत वरातीतील वऱ्हाड मुक्कामी असायची. किंवा पाच-पन्नास बैलगाड्यांचा ताफा आणि शेकडो वऱ्हाडी असल्याने रात्रभर सुद्धा वरातीचा प्रवास सुरूच असायचा. परंतु बैलांना विश्रांती म्हणून पाणवठ्यावर वरात काही वेळ थांबा घेत असे. यातून लग्नातील सहकार्य, सार्वमत आणि संकटाला धावून जाण्याची वृत्ती दिसून येते. 

        कालौघात मानवी प्रतिभेने चारचाकी वाहने निर्माण केली आणि लग्नातील बैलगाडीवर निघणारी वरात मागे पडू लागली. एकोणिसाव्या शतकाच्या सहाव्या-सातव्या दशकात विसोरा परिसरात ट्रँक्टर अवतरला. परंतु तेव्हाही गावखेड्यातील लग्नवरात बैलगाडीवर जायची. परंतु सन १९९० नंतर लग्नातील वरात चारचाकी वाहनाने काढण्यात येऊ लागली. आता आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार एखाद दोन किंवा दहा-वीस किंवा पन्नास मोटारगाड्या आणि उरलेल्या वऱ्हाडींसाठी ट्रँक्टरवर लग्नाची वरात काढली जाते. आता आधीसारखे पशुधन नाही त्यात जंगल कमी, गावे जवळ आली आणि वाहतूक साधने वाढल्याने लग्नाची वरात सजवलेल्या मोटारगाडीवर काढली जाते.

        बैलगाडी आणि खाचर यांवर बसून नवरदेव, नवरीची वरात काढण्यात येत असे. लग्न म्हटल्यास बैलगाडी, खाचर असणे एक अविभाज्य भागच. बैल, बैलगाडी, खाचर यांची संख्या अधिक, चारचाकी वाहनांचा अभाव आणि आर्थिक परिस्थिती त्यामुळे गावखेड्यात होणाऱ्या हरएक लग्नाची वरात बैलगाडीतून काढली जात असे. दिवसेंदिवस बैल आणि बैलगाड्या कमी होत आहेत त्यामुळे बैलगाडीतून काढली जाणारी नवरदेव-नवरीची वरात लुप्त होत आहे.

        त्यातच आजपासून एक वर्षांपूर्वी प्रथमच आणि आता पुनश्च आलेल्या कोरोनाने लग्न कार्याँवर नको तितके निर्बंध लादल्याने लग्न पाहावे करून असे म्हणण्याची वेळ सर्वांवर येऊन ठेपली आहे. तेव्हा नेमक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकल्या जात आहेत.


वरातीत रंगायची लग्नगीतांची मैफिल

               लग्न म्हटल्यास त्याला सुमधुर अशा लग्नगीतांची अस्सल साज असतेच. आजही ग्रामीण भागातील प्रत्येकच लग्नात झाडीबोलीतील लग्नगीते गायली जातात. बैलगाडीने लग्न वरात नेत असतांना बैलगाड्यांवर बालगोपाल, महिला-पुरुष, वृद्ध सारेच वऱ्हाडी. वरातीचा प्रवास अतिदाट अशा वनातुन राहायचा त्यामुळे प्रवासात गप्पा-गोष्टी तर चालायच्या परंतु वरातीची खरीखुरी रंगत आणि माहौल रंगायचा महिलांच्या मधुर अशा लग्नगीतांनी. एकीकडे जंगलातील पक्षांचे नैसर्गिक गुंजण तर दुसरीकडे कोणत्याच संगीत साधनाचा वापर न करता महिलांच्या कंठातून बाहेर येणाऱ्या ऐकीव, गोड अशा सामुहिक लग्नगीतांचा आवाज त्यामुळे या दोन्हींच्या मिलापाने वरात एकदम संगीतमय होऊन जात असे. आणि वरातीचा नूर पार पलटुन जात असे. गप्पा-गोष्टी आणि लग्नगीतांनी वरातीचा प्रवास अगदी मनोरंजक आणि आनंददायी होत असे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी