हरल्यामुळे अश्रू ढाळणारा बोंगा बैल
माणसामाणसांमध्ये असलेल्या खऱ्याखुऱ्या आणि जिवापाड प्रेमाची शोधाशोध चालली असतांना माणूस मात्र आपली माणूस जात सोडून इतर मुक्या जनावरांवर अस्सल स्नेह जपण्याचा जिवापाड प्रयत्न करतो. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तहसीलमधील कोकडी या खेडेगावात राहणारे मोहम्मद जमाल गनी शेख यांनी आपल्या घरी विकत घेऊन आणलेल्या लाडल्या बोंगा उर्फ टकली उर्फ गनी (बैल) ला इतक्या मायेच्या ओलाव्याने सांभाळले की याच तरूणपणातल्या बैलाने अजेय वृत्तीने पंचक्रोशीतील बैल शर्यती गाजवल्या. अखेर बैलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावरील प्रेमाखातर शेकडोंनी अंतिमविदाई देत त्याच्या कर्तृत्वाला सलाम केला.
कोकडी येथे वास्तव्यास असलेल्या मोहम्मद जमाल गनी शेख यांना शंकरपटाची मोठी हौस. याच हौसेने त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील चिखलगाव येथून वासरू घेऊन आणला. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नंतर हाच बैल दोन दाती पण शिंग नसलेला म्हणून बोंगा आणि काही दिवसांत आलेले शिंग आखूड पण वक्र असल्यामुळे टकळी तर मालकाचे आडनाव गनी त्यामुळे गनी अशा तीन नावांनी ओळखला गेला. आपल्या मुलाबाळांवर जसा प्रेम करतात अगदी त्याच आपुलकीने, ओढीने, काळजीने जमाल बोंगा वर जीव ओवाळून टाकायचे. त्याचे पालनपोषण सुद्धा जणू घरच्या सदस्या एवढ्याच ममतेने. एरवी कधीही न पिणारे दुध हा बोंगा बैल मात्र अवीट चवीने कुत्रासारखा गटागटा प्यायचा. तूप तर चवीने चाखायचा. सामान्यतः बैलांना न आवडणाऱ्या वस्तू मोठ्या आवडीने खायचा.
मोहम्मद जमाल शेख सांगतात की, बैलाच्या जंगी इनामी शंकरपटमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या बैलांच्या शर्यतीत नवीन असतांना चंद्रपूर जिल्ह्यातील नान्होरी-दीघोरी येथे पट होती. शर्यतीत बैल तरवेजला आणि जखमी झाला. तरीसुद्धा बोंगा बैलाने ती शर्यत जिंकली. बोंगा बैलाने आपल्या २५ ते २६ वर्षाच्या आयुष्यात खेळलेल्या सुमारे १५-२० शर्यती कधीही न हरता अजिंक्य राहिला. यशाचा लखलखणारा दिवा स्पर्शून अजेय वृत्ती राखणाऱ्या बोंगा बैलाच्या जीवनातील एक खेळ मात्र मेंढा येथे खेळला गेला. या शर्यतीत त्याला पराभव स्विकारावा लागला. हा पराजय बोंगा बैलाच्या जिव्हारी लागला आणि चक्क मानवासारखा रडू लागला. डोळ्यातून ढळणाऱ्या अश्रूंनी बोंगामधील असलेल्या मानवी संवेदना दिसून आल्या. त्यावेळी तिथे उपस्थित लोकांनी हा मानव आणि बैल यांच्या जीवनातला भावनाशील असा दुर्मिळ प्रसंग आपल्या डोळ्यात साठवला. बोंगा उर्फ टकली याने जिंकलेल्या शर्यतीतून टीव्ही, सोने, दोन कुलर, पंखा आदी साहित्य पारितोषिकाच्या माध्यमातून प्राप्त केले.
भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांतील शंकरपट बैल शर्यतीत बोंगा बैलाने सहभाग घेतला. मसली वीलम येथे सन २०१४ साली बोंगा आपल्या उभ्या आयुष्यातील शेवटची शर्यत खेळला. बंड्या पटात नवरदेव म्हणून चंद्या अशी ओळख बोंगा बैलाने मिळविली.
अखेर जन्मलेल्या प्रत्येकच जीवाला मृत्यूला सामोरे जावे लागते. बोंगा बैल हा खराखुरा पटाचा बैल होता याला नियतीने सुद्धा मान्य केले. कारण बोंगा बैलाने तालुक्यातील कुरूड येथल्या शंकरपटाच्या दिवशीच या जगाचा निरोप घेतला. मात्र त्याच्या कर्तृत्वाने बोंगा बैलावर शेकडो लोकांनी प्रेम केले. या प्रेमाच्या ओढीने त्याच्या मृत्यूपश्च्यात चिखलगाव, जि. चंद्रपूर, नैनपुर, कोकडी येथील शेकडो लोक अंतिमसंस्काराला हजर होते. मालक मोहम्मद जमाल गणी शेख यांनी शेकडो लोकांच्या उपस्थितीत मुस्लिम रितीरिवाजानुसार खड्डा, पूजापाठ करून बोंगाला जमिनीत दफन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा