कोरोनाच्या धास्तीने जुन्या सवयींचा नव्याने स्विकार
पाहुणा म्हणजे जणू देवच. देवाच्या उपमेने सुशोभित पाहुणा घराच्या अंगणात येताच घरातल्या साऱ्यांच्या आनंदाला पारावर राहत नसे. लागलीच घरची स्त्री अतिशय आदराने लाकडी पाट आणि पाणी आणून द्यायची आणि पाहुणा लाकडी पाटावर उभा राहून हात-पाय-चेहरा पाण्याने स्वच्छ धुतल्यावर मगच घरात प्रवेश करीत असे. आसनस्थ अतीथीचे स्वागत म्हणून चुलीवर शीजलेली आंबील दिली जायची वा थेट जेवण दिले जायचे. अशाप्रकारे घरी आलेल्या पाहुण्याचा मानपान केला जायचा पण स्वच्छता सुद्धा राखली जायची. ही गोष्ट आहे आजपासून तब्बल चार-पाच दशकांपूर्वी पर्यंतची. कोरोना विषाणूच्या संक्रमणाला आळा बसावा म्हणून सुरू असलेल्या ब्रेक द चेन (लॉकडॉऊन) निमित्याने वयाची सत्तरी-ऐंशी गाठलेल्या महिला-पुरुषांशी गप्पा केली असता ते बोलते झाले.
मनात आठवणी दाटून आल्यावर वा विशिष्ट कामानिमित्त आपण नातलग, ओळख असलेल्यांच्या घरी पाहुणा म्हणून जातो. सत्तर वर्षांआधी जंगल अतिशय घनदाट, लोकसंख्या विरळ, गावे दूरदूर, रस्ते-पूल नाही, दळणवळण, संपर्क साधनांच्या अभावी अनेकअनेक दिवस, वर्षे आप्त-स्वकीयांची प्रत्यक्ष भेट होत नव्हती. त्यामुळे एकमेकांशी असलेला जिव्हाळा, ओढ आणखीनच घट्ट व्हायची. याच ओढीने पाहुणा ज्यावेळी घरच्या अंगणात आला की त्याच्या मानपानाला सीमा नसे. एकत्र कुटुंब पद्धतीने तर पाहुण्यांच्या येण्याला सण-उत्सवाचे रूप येई. सारेच आनंदाने गहिवरुन जात. घराचा उंबरठा ओलांडण्याआधी पाहूण्यास अंगणात ठेवलेल्या लाकडी पाटावर उभे राहून भांड्यात ठेवलेल्या पाण्याने हात, पाय, चेहरा धुवायला सांगितले जात असे. या मागे विज्ञान होते, त्याकाळी पायी वा बैलगाडीने दूरवरून रस्त्याने प्रवास करून पाहुणा घरी येत असे. या प्रवासात त्याच्या हाता-पायाला लागलेले मळ आणि चेहऱ्यावरची धूळ पाण्याने स्वच्छ केली जायची. याच माध्यमातून मळ वा धुळीतून पसरणारे विषाणू, जीवाणू दुसऱ्या घरी उंबरठा ओलांडण्यापूर्वीच नष्ट होत. तसेच तासनतास प्रवास केल्यामुळे शरीराला आलेला थकवा दूर व्हावा म्हणून सुद्धा पाणी दिले जायचे.
मनुष्य जसा स्वतःसह जगबदलवीण्याच्या नादात अधिक अधिक आधुनिक होत गेला त्या बदलामध्ये पाहुणे घरी आल्यावर हात-पाय धुवायला पाणी देण्याची प्रथा लुप्त झाली. दळणवळण, संपर्क साधने प्रचंड वाढली त्यामुळे एकमेकांमधील अंतर फार कमी झाले पण नात्यांमधला दुरावा अधिक जास्त झाला. आज कोरोना विषाणू पसरू नये म्हणून जिकडेतिकडे बाहेरून आल्यावर हात-पाय-चेहरा धुवून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनामुळे गावाच्या प्रवेशद्वारावर सुद्धा बाहेरून आलेल्या सर्वांना हातपाय धुवायला लावले जात आहे. आता घरोघरी घरच्या सदस्यही बाहेरून आल्यावर हातपायचेहरा धूण्याची सावधानता बाळगत आहेत. *आजच्या अत्याधुनिक काळात जुन्या सवयी, प्रथा, परंपरा हिणवल्या जात असतांना कोरोना विषाणूच्या प्रवेशाने का असेना जुन्या सवयींचा पुन्हा नव्याने स्विकार केला जात आहे.*
आंबील पेय हे आज अगदी बोटावर मोजता येतील अशा घरी शिजवल्या जाते. आंबील म्हणजे तांदुळ किंवा गहूच्या पिठापासून तयार केले जाणारे पेय. आधीच्या दिवशी रात्री गहू किंवा तांदूळ पीठ पाण्यात भिजू टाकल्या जाते. दुसऱ्या सकाळी आंबट चव आलेल्या पीठपाणी मिश्रणाला गरम पाण्यात उकळल्यावर जे पदार्थ तयार होते तेच आंबील पेय. पूर्वी आजच्यासारखी चहाची क्रेझ नव्हती. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांचे आंबील पेय देऊन स्वागत होत असे.
जूणेजाणते वयोवृद्ध व्यक्ती सांगतात कि, पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीने राबता असल्याने एकाच घरात पाच-पन्नास सदस्य राहत. त्यातच आरोग्याच्या कसल्याही सुविधा नसल्यात जमा त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीला साधे ताप आले वा सर्दी-खोकला झाला असल्यास त्या सदस्यापासून इतरांना दूर राहण्याचा, त्याच्यासोबत एकाच ताटात वा त्याच्या हाताने घास न भरवून घेण्याची तंबी इतरांना दिली जात होती. एकूणच आजारी व्यक्तीच्या संपर्कात न येण्याचा संदेश देऊन कुटुंबातील इतरांना संसर्गापासून मुक्त ठेवण्याचा सामूहिक प्रयत्न केला जात होता. आज आरोग्याच्या क्षेत्रात अनेकानेक अत्याधुनिक तंत्र, यंत्र आले सुविधा आल्या तरीही जुन्या काळातील आरोग्यसंवर्धन करणाऱ्या सवयी पाळणे आजच्या कोरोना महामारी काळात सुद्धा प्रासंगिक आणि वास्तववादी आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा