सेंद्रिय ते रासायनिक शेतीच्या प्रवासात देशी वाणांचे गमन

विसाव्या शतकातील सातव्या दशकाच्या मध्यंतरी घडून आलेल्या हरितक्रांतीने कृषिक्षेत्र चकाकून गेला. अन्नधान्याने भारत गदगद झाला. त्यासाठी सुधारित धानाच्या जातींचा सुध्दा मोठा हातभार लागला. याच सुधारित धानाच्या जातींनी ग्रामीण भागातला धानाचा पट्टा गाठला. सन १९७० च्या आसपास विसोरा परिसरातील शेतात संकरित धानाच्या वाणाने प्रवेश केला. जास्त उत्पादकता, रोग प्रादुर्भाव कमी असल्यामुळे संकरित वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आणि पाहता पाहता पारंपरिक धानाचे जुने वान धानाच्या कोठारातून हळूहळू गायब होत गेले.

            नैसर्गिक तसेच मानवी पर्यावरणीय बदलाच्या प्रवासात सेंद्रिय शेतीने रासायनिक शेतीचे रूप धारण केले. मशागतीसाठी पारंपरिक साधनांच्या जागी आधुनिक यंत्रांनी जागा घेतली. त्यामुळे काळानुसार कमी उत्पादन, कमी पैसा मिळवून देणारे, रोग-किडिला बळी पडणारे पारंपरिक धानाचे वाण जास्त उत्पादन, जास्त पैसा मिळवून देणाऱ्या संकरित वाणाच्या गर्दीत दिसेनासा झाला. चवदार आणि पौष्टिक असूनही धानाचे जुने वाण आता लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. या पारंपरिक सूक्ष्मअन्नद्रव्यांनीयुक्त असलेल्या देशी वाणांचे संकलन, संवर्धन, संगोपन, उत्पादन करण्याची आज नितांत गरज आहे.

            सन १९७३ ला गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणाचे पाणी कालव्याद्वारे विसोरा भागातील शेतात उतरले. याच वर्षी सर्वात पहिल्यांदा विसोरा येथील काही शेतकऱ्यांनी मालगुजारी तलावाखालील शेतांमध्ये उन्हाळी धानाची फसल केली. या फसलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे की, विसोराच्या मातीत प्रथमच धानाचे सुधारित वाण पेरले गेले. तसेच पारंपरिक धानाचे वाण पण पेरण्यात आले होते. मात्र उन्हाळी हंगामाच्या मळणीनंतर सुधारित धानाचे उत्पादन देशी वाणाच्या उत्पादनापेक्षा अधिक राहिले. कारण सुधारित धानाच्या शेतीसाठी प्रथमच रासायनिक खत वापरले गेले होते. सुधारित धानाची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. त्यामुळे त्यांचे उत्पादन चांगले होते. त्या तुलनेत पारंपरिक धानाच्या वाणाची उत्पादकता कमी राहिली. 

            शेतकरी सांगतात १९७३ मधील उन्हाळी धानाच्या फसलीनंतर बहुतांश शेतकऱ्यांनी दरवर्षीच्या खरीप तसेच उन्हाळी फसल असेल त्या वर्षी धानाचे सुधारित वाण पेरण्यास सुरुवात केली. याला एकमेव कारण म्हणजे सुधारित वाणांची उत्पादकता देशी वाणांच्या उत्पादकनापेक्षा नेहमी जास्त राहिली. सुधारित वाण सरस ठरले आणि शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले. त्या तुलनेत कमी उत्पादकता आणि कमी रोगप्रतिकारशक्ती या कारणांनी पारंपरिक धानाच्या वाणांना शेतकऱ्यांनी दूर लोटले.

            १९७० पर्यंत पूर्णतः पारंपरिक आणि शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जात होती. रासायनिक खत बिलकुल वापरले जात नव्हते. त्यामुळे देशी धान नैसर्गिक जमिनीत पिकत असे. परंतु हरितक्रांतीसाठी जास्त उत्पादन देणारे सुधारित धानाचे वाण, अधिक रासायनिक खत वापरण्यास प्रारंभ झाला. १९७० नंतर कृषी क्षेत्रात बदलाचे वारे वाहू लागले. या वाऱ्याची झुळूक विसोरा परिसरालाही लागली. सुधारित धानाच्या लागवडीतून जास्त उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खत, नायट्रोजन, फॉस्फेट' युरिया, डीएपी यांच्या अतिवापरामुळे गेल्या पन्नास वर्षात जमीन पर्यायाने शेती सेंद्रिय राहिली नाही. देशी वाणाच्या जागा सुधारित वाणाने जागा घेतली. दरवर्षी बारीक वा ठोकळ असे शकडो सुधारित वाण बाजारात येऊ लागल्याने संकरित वाणाला प्रचंड पसंती मिळू लागली. देशी धानाचे उत्पादन संकरित वाणापेक्षा दुप्पट-तिप्पट कमी होत असे. दिवसेंदिवस देशीवाणाला बाजारभाव कमी मिळू लागला. त्यामुळे धानपीकाचे देशी वाण पेरण्याकडे लोकांचा दुर्लक्ष झाला. लोकांची चव बदलली.

          लुचाई, लुडका, ढवूर, वऱ्हाडी, कालीकमोद, काली मुच, आंबेझोक, सुलटो, चेन्नुर, काटेचेन्नुर, टपरी, मोरपंखी, कपूरसार, मोगरा, हिराणकी, कॅलेंडर, डुबराज, विष्णूभोग, ललाट, सुवर्णा, गादमाशी इत्यादी धानाच्या जुन्या वाणांनी अनेक वर्षे इथल्या मातीत रूजूण लक्षावधी लोकांच्या अन्नाची सोय केली. बळीराजा सुद्धा अगदी मातीशी एकरूप होऊन शेती करत आला आहे. पण गेल्या पन्नास वर्षात जुने वाण बदलून संकरित धानाचे बी-बियाणे पेरले जात असल्याने धानाची चव, पौष्टिकपणा गेला. शेणखताऐवजी रासायनिक खत तसेच कीटकनाशके यामुळे धानाची अस्सल सेंद्रिय शेती असेंद्रिय झाली. जमीनीच्या नांगरणी ते मळणीसाठी अत्याधुनिक यंत्र अवतरल्याने पशुधन कमी झाले. एकूणच धानाच्या शेतीत अनेक पर्यावरणीय बदल झाले. काळानुसार आणि आर्थिकदृष्ट्या हा परिवर्तन अपरिहार्य असला तरी धानाचे पारंपरिक जुने वाण आता लुप्त होत आहेत हे सत्य मात्र स्विकारावे लागेल.

          मोरपंखी ही देशी धानाची वाणाची आहे. एकेकाळी आपल्या गुणांनी प्रसिद्ध असलेला आणि आता अत्यंत दुर्लभ असणारा देशी वाण. आजही हे मोरपंखी धानाचे जुने वाण भीमसेन डोंगरवार रा. धाबेपवनी (जि. गोंदिया) यांनी आपल्या घरी जतन करून ठेवले आहे. विशेष म्हणजे, डोंगरवार हे नैसर्गिक पद्धतीने शेती करतात आणि धानाच्या देशी वाणाच्या संवर्धनासाठी ते दरवर्षी मोगरा हे धानाचे देशी वाण पीकवतात. तसेच याच धानाचे भात सुद्धा खातात.

            पन्नास वर्षांपूर्वी रासायनिक खत आणि कीटकनाशके यांचा थांगपत्ता नव्हता. पशुधन बहुसंख्येने असल्याने प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीचे भरपूर असे शेणखत होते. धानाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या वेळेस शेणखत धानाच्या शेतात बैलबंडीने टाकला जात असे. शेणखताशिवाय देशी धानाच्या शेतीसाठी दुसरे काहीच शेतात टाकले जात नव्हते. फक्त आणि फक्त शेणखत टाकून अस्सल नैसर्गिक, शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जात होती. देशी धानाच्या वाणाचे तयार होणारे भात अत्यंत रुचकर, स्वादिष्ट होते.

         मात्र वर्तमान धानपिकासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खत, कीटकनाशके वापरले जातात. आताच्या संकरित धानाचा भात देशी भाताच्या तुलनेत रुचकर वाटत नाही. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या चारही जिल्ह्याच्या झाडीपट्टी भागात अजूनही काही शौकीन लोक जुन्या देशी वाणाची शेती करतात. आणि त्याच देशी धानाच्या भाताची चव घेतात.

        जुन्या वाणाच्या भाताची चव घेतलेले असंख्य लोक आज आहेत मात्र आता ते नव्या वाणाचे भात खातात. अशाच अनेकांना जुन्या भाताची चव आणि आताच्या सुधारित भाताची चव याबाबत विचारले असता सर्व एकच बोलतात जुन्या तांदुळाची चव नव्या (संकरित) तांदुळाला येऊ शकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी