स्वातंत्र्यापूर्वीच विसोरा येथे पोहोचली सायकल

     मानवी जीवनात आलेल्या आगंतुक संकटांशी मुकाबला करतांना डगमगणाऱ्या मनाचा आणि ढासळणाऱ्या शरीराचा सुयोग्य समतोल कसा सांभाळावा आणि प्रचंड आत्मविश्वासाने त्या संकटावर मात कशी करावी, हि शिकवण आपणास सायकल देते. निर्जीव असली तरी सजीव माणसाला सायकलचे अपार वेड आणि आकर्षण. आजपासून तब्बल पन्नास-साठ वर्षांपूर्वीपर्यंत सायकलची क्रेझ इतकी कि अख्खी पंचक्रोशी तीला पाहायला अतीव आतुर व्हायची. आज विसोरा गावात शेकडोच्या संख्येत सायकल आहेत. परंतु भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी सन 1940 च्या दरम्यान विसोरा गावात गोपाळ बुद्धे यांनी सर्वात पहिली सायकल आणली. आज (दि. 3 जून) जागतिक सायकल दिन त्यानिमित्ताने सायकल आणि तिच्याशी निगडीत विसोरा गावातील गोड आठवणींना दिलेला हा उजाळा.

         स्वतःच्या वजनाच्या कितीतरी पट वजन वाहून नेणारी सायकल आकार, रुप कसेही असले तरीही जीवनात फार मोठे कर्तृत्व, उंची गाठता येते हे सिद्ध करते. एकापेक्षा अधिक माणसे तसेच वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला सायकलचा वापर केला जायचा. आजही केला जातो. विसाव्या शतकाच्या नवव्या दशकापर्यंत सायकल म्हणजे मानवी जीवनाचा अविभाज्य असा घटक जणू कुटुंबातला सदस्यच. पूर्वी आजच्यासारखी दळणवळण साधने तसेच रस्ते, नदी-नाल्यावर पूल नव्हते तेव्हा अगदी सहज आणि सोईस्कर असे वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर केला जात होता. मात्र प्रत्येकच घरी आणि व्यक्ती सायकल घेऊ शकत नव्हता. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताचीच असलेल्या लोकांना सायकल घेणे शक्य नव्हते. त्यावेळी आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या विसोरा येथील ठेकेदार गोपाळ बुद्धे यांनी गावामध्ये पहिलीवहिली सायकल आणली. अशी माहिती माजी न्यायाधीश ज्ञानदेव परशुरामकर यांनी दिली.

         दुसरा वर्ग उत्तीर्ण असूनही गोपाळ बुद्धे यांना इंग्रजी लिहिता, वाचता यायची. त्यांचा जन्म (7 जानेवारी 1901) आणि मृत्यू (18 मे 1971) विसोरा येथेच झाला. ते रस्ता, इमारत बांधकामाचे कंत्राट घेत असत. ते कामानिमित्त सतत चंद्रपूर, नागपूर येथे प्रवास करायचे. त्यामुळे तेव्हाच्या काळात बाजारात येणाऱ्या नवनव्या वस्तूंबाबत त्यांना माहिती मिळायची. कवी एकनाथ बुद्धे सांगतात कि, माझ्या 1946 या जन्म वर्षांच्या पाच-सहा वर्षांपूर्वीच गोपाळ बुद्धे यांनी गावात पहिली सायकल आणली. अवघ्या दोन-तीन रुपयाला त्यांनी सायकल आणली असावी. सन 1940च्या दरम्यान विसोरामध्ये पहिल्यांदा सायकल आणल्या गेली तेव्हा अख्खा विसोरा गाव, तुळशी, कोकडी, शंकरपुर येथील बहुसंख्य नागरिक सायकल पाहायला आले होते. अख्खे आयुष्य घर, शेत आणि घनदाट जंगलात गेल्याने कल्पनेच्या पल्याड असलेल्या नूतननव्या वस्तूंच्या आगमनाने सारेच गावकरी आश्चर्यचकीत झाले होते. सायकलच्या सीटवर बसून कुणी पायडल मारून सायकल पुढे चालवू लागताच तिच्या भोवताल गोळा झालेले सारेच तिच्या संगतीने धावू लागायचे. सायकलने नागरिकांमध्ये फारच नवलाई निर्माण झाली होती. परंतु सायकलच्या जवळ जायला कुणी धजावत नव्हते. कारण सायकल अंगावर पडल्यास मृत्यू होण्याची भीती लोकांना वाटत होती.

         पुढे काळ बदलत गेला. सायकलची संख्या वाढत गेली. पण महत्व, वापर सुरूच होता. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञान अवतरले त्यामुळे पेट्रोल वा डिझेल या इंधनावर चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी गाड्या आल्या. आणि क्रेझ उतरू लागली. 1990 पर्यंत तर चांगल्या शासकीय नोकरीवर असणारे सुद्धा तिचा उपयोग करत होते. आता एकविसाव्या शतकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या दशकाच्या संक्रमण काळात कोरोना महामारीने हाहाकार माजविल्याने शरीर संवर्धन आणि सुदृढ करण्यासाठी पुनश्च सायकलचे चाक धावू लागले आहेत. गावात सधन लोकांचा राबता असल्यामुळे बाजारात आलेली महागडी वस्तू पंचक्रोशीत सर्वांत पहिल्यांदा विसोरा येथे आणली जात होती. त्यातच विसोरा गाव सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय दृष्ट्या अत्यंत नावाजलेला असा गाव आहे. असाच हा गावात आलेल्या पहिल्यावहिल्या सायकलचा इतिहास.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी