समृद्ध पर्यावरण
निसर्ग केवळ एकट्या मानवाचे नाही. हेच मनुष्य विसरत असल्यामुळे आपल्या परिसरात राहणाऱ्या ईवलाशा किटकापासून महाकाय हत्तीपर्यंत तर कुंडीतील वेलापासून आडदांड वृक्षापर्यंतच्या साऱ्यांनी मिळून तयार होणाऱ्या पर्यावरणाचा बेभानपणे नाश करण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र आजही वडसा वनविभाग वडसा अंतर्गत येणाऱ्या वडसा रेंजमध्ये जमिनीवर तसेच पाण्यात राहणाऱ्या पाळीव प्राणी वा वन्यपक्षी, प्राणी आणि वनस्पती यांच्या वास्तव्याने येथील जैवविविधता श्रीमंतीत असून समृद्ध पर्यावरणाचा वास येथे आहे. आज (दि. 5 जून) जागतिक पर्यावरण दिन त्यानिमित्ताने पर्यावरणाप्रती जागृती आणि स्थानिक पर्यावरणाचा अनमोल ठेवा जपण्यासाठी माहिती देण्याचा हा प्रयत्न.
ज्या जंगलात बेडुक, रानकोंबड्या असतात त्या जंगलातील जैवविविधता समृद्ध असते. तर मोर ज्या जंगलात वास्तव्यास असते तेथील जैवविविधतेचा ऱ्हास होत असल्याचे लक्षण मानले जाते. विशेष म्हणजे, वडसा वनक्षेत्रात रानकोंबड्या आढळतात त्यामुळे येथील जंगलात समृद्ध जैवविविधता नांदते हे स्पष्ट होते. एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या वडसा वनविभाग वडसा मधील वडसा रेंजमध्ये अंदाजे 18000 हेक्टर जंगल आहे.
वडसा वनक्षेत्रातील पर्यावरणात हरियाल, साळुंकी, चिमणी, सुगरण, दयाळ, कोतवाल, लालबुड्या बुलबुल, शिपाई बुलबुल, धनेश, भारद्वाज, कोकिळ, टिटवी, काळी शराटी, वेडा राघू, पारवा, ढिवर, स्वर्गीय नर्तक, घार, पाणकोंबडी, हुदहुद, चीरक, कवडी मैना, हलद्या, कावळा, सुतारपक्षी असे अनेक पक्षी आहेत. गेल्या हिवाळ्यात देसाईगंज तालुक्यातील चिखली तूकूम येथील तलावात गूज हा स्थलांतरित पक्षी आढळला. तसेच रानकुत्रे, तडस, वाघ, चांदी अस्वल, बिबट, रानमांजर, रान गवे, हरीण हे वन्यप्राणी आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरची तालुक्यातील बेळगावच्या जंगलात दोन जंगली हत्ती आढळले होते. चौकशीअंती ते उड़ीसा राज्यामधून बेळगाव परिसराची रेकी करण्यास आल्याचे समजले. त्यानंतर बेळगाव जंगलात अजूनही हत्ती आढळलेले नाहीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा