धान मळणीचा शेवट गोड करणारी संजोरी झाली लुप्त

अती दाट वनांनी व्याप्त गडचिरोली जिल्ह्यात आधीपासूनच चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे जास्त पावसात पिकणाऱ्या धानपीकाला या पट्ट्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती आहे. विसाव्या शतकातील पाचव्या दशकापर्यंत आजच्यासारखी अवघ्या काही तासांत कापणी-मळणी करून धानरास घरी पोहचवणारी अत्याधुनिक यंत्रे नव्हती. परिणामी पाच-दहा दिवस ते महिनामहिनाभर इथल्या धानपिकाची मळणी चालायची. अशावेळी शेतातील धानाचे झालेले उत्पादन आणि झालेल्या श्रमातून मुक्तता यांचा आनंद म्हणून साजरा करण्याचा, शेतातल्या खऱ्यावरचा अन्नग्रहणाचा उत्सव म्हणजे संजोरी. ही संजोरी गेल्या पाचदहा वर्षांपूर्वीपर्यंत शेतशिवारातील हरएक शेतात अगदी मजेत आयोजित होत असे. मात्र आता मानवनिर्मित तंत्रयुक्त वेगवान यंत्रांचा कृषी क्षेत्रात सुद्धा शिरकाव झाल्याने शेतावरल्या खऱ्यावरची धानपिक मळणी आणि मळणीचा शेवट अतीव गोड करणाऱ्या संजोरीची अस्सल गावरान मजा काळाच्या ओघात लुप्त झाली आहे.

              विसावा शतक जसजसा पुढे जाऊ लागला तसतसे नवनवी मानवी संशोधने जगापुढे येऊ लागली. जणू संशोधनांची स्पर्धाच ! पण इथल्या ग्रामीण भागात या संशोधनातून बाहेर आलेली यंत्रे यायला खूप वर्षांचा काळ लागला. जंगलच जंगल आणि दूरदूर मानवी लोकवस्ती असे ते स्वरूप. गावाला लागून वा जंगल तोडून शेती लायक शिवार तयार होत गेले. नाले, नदीकाठावर सुद्धा शेतीलायक जागा तयार झाली. या दरम्यान हा पट्टा अतीपावसाचा त्यामुळे धानपिक हेच सर्वोत्तम पीक. धानपिक पेरणी, नांगरणी, खत टाकणे, चिखलणी, रोवणी, निंदण, कापणी, बांधणी, मळणी, धानरास घरी नेणे ही सारीच कामे मनुष्यबळ वापरून केली जात. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून शेतकरी शेतात राबू लागायचा. एकदा का जूनच्या मृग नक्षत्राचा पाऊस बरसला की शेतकरी धान पेरणी साठी नांगरणी, वखरणी, पट्टा मारणे ही कामे स्वतःच करायचा. तेव्हा संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे शेतमालक आणि त्याच्या घरचे शेतात राबायचे. ज्यांच्याकडे दहावीस एकराहुन जास्त जागा ते मजुरांकडून काम करवून घेत. रोवणी आटोपल्यावर बळीराजाला चाहूल असायची धानपिक कापणी-मळणीची.

              धानकापणी सुरू झाल्यावर काहीच दिवसांत बांधणी करून धान पुंजणे रचले जात. इथून धानपीक शेतीचा अगदी शेवटचा पर्व प्रारंभ व्हायचा. शेतातील एका सपाट, ओलसरपणा नसलेल्या बांधीत धानपीक मळणीकरिता खरा तयार केला जात असे. खरा बनविण्यासाठी आधी त्या बांधीतील गवत, कचरा काढून त्यावर शेणाचा मुलामा (सारवण) दिला जातो. दुसऱ्या दिवशी तयार झालेल्या खऱ्याच्या सभोवताल असलेल्या धान पुंजण्यातील धानभारे खऱ्यावर पसरवले जात. त्यासाठी लाकडी आकोळी वापर होत असे. त्यापूर्वी खऱ्याच्या मध्यभागी एक लाकडी मेळ गाडल्या जात असे. त्या मेळाला दोर बांधून तो पहिल्या बैलाच्या गळ्यातील दोर दुसऱ्या बैलाच्या गळ्यात असे सलग चार-पाच बैल बांधले जात त्यालाच बैलाची पात म्हणत. फार पूर्वीपासूनच बैल हा शेतातल्या श्रमाचा राजा. चार-पाच बैलांची पात तयार करून खऱ्यावर टाकलेल्या धानाच्या पिकावर तासनतास चालवले जात. बैलांच्या खूरांनी धानाची मळणी होत असे.

           बैलाच्या पातीने अनेक वर्षे धानपिक मळणी चालली. बैलांची पात मागे पडून बैलाच्या जोडीला मागे लाकडी बेलन बांधून धानपीक मळणी सुरू झाली. ही पद्धत पण काही वर्षे कायम होती. बेलन पद्धतीच्या जागी बैलगाडीने धानपीक मळणी केली जाऊ लागली. हा काळ बैलगाडीचा सुवर्णकाळ होता. सारी कामे बैलगाडी वापरून होत. याकाळात एका एका शेतातील धानपीक मळणी पाचदहा दिवस ते महिनामहिनाभर चालायची. तासनतास मळणी झाल्यावर खऱ्यावरची तणस लाकडी आकोडीने बाहेर काढून धानाचे ठिग तयार करत. या धानाच्या ठिगांना झाडीबोलीत मंदन म्हटले जात असे. आणि पहाटे पहाटे उठून सुपात घेऊन हवेच्या दिशेने हे मंदनातील धान उडवले जात त्यामुळे धानातील कचरा उडून धानरास तयार करत. धानरास म्हणजे साफसूफ केलेले धान. धानरास ही अख्ख्या हंगामाची कमाई म्हणून त्याची देखभाल आणि रक्षण अगदी डोळ्यात तेल घालून करण्यात येत असे. बैलबंडी वापरून धानरास घरापर्यंत आणल्या जाई. यादरम्यान शेतीमालक पुरुष आणि त्याच्या घरची पुरुष मंडळी आणि पुरुष मजूर या सर्वांचा मुक्काम शेतात रहायचा. यावेळी घरची महिला सर्वांचा स्वयंपाक डोक्यावर घेऊन पोहचवून देत असे. किंवा त्याच ठिकाणी स्वयंपाक केल्या जात असे. यात सर्वांनाच आणि सर्वांत जास्त आकर्षण असायचा तो संजोरीचा. धानपीक मळणी झाली की केला जाणारा सामुहिक मांसाहारी जेवण. या जेवण प्रसंगी मित्र वा आप्त सुद्धा यायचे. ही मजा आज वयाची साठी पूर्ण केलेल्या हरएक शेतकऱ्यांनी अनुभवली आहे. 

              आणि भारत स्वतंत्र झाल्यावर 1954 च्या जवळपास विसोरा येथे ट्रँक्टर आला. म्हणजे आजूबाजूच्या परिसरात सुद्धा आला. त्यामुळे धानपीक मळणीचा अती वेळखाऊपणा आणि अती मेहनत हळूहळू कमी झाली. ट्रँक्टर खऱ्यावरच्या धानपिकावर गोलगोल फिरवून धानाची मळणी केली जात असे. आणि पुढच्याच काही वर्षात धान पीक मळणी करणारी मशीन आली. पाहतापाहता महिनोमहिने चालणारी धानपीक मळणी अवघ्या काही तासांत होऊ लागली. त्यामुळे वेळेची बचत झाली. महत्वाचे म्हणजे शेतमालकाचे कष्ट कमी झाले. मशीनवरील मजूर सारे काम करतात. बैलबंडी लोप पाऊन ट्रँक्टरने धानरास घरी पोहचू लागली. त्यात आता कापणी-मळणी करणारे ट्रँक्टरवरचे यंत्र तसेच हार्वेस्टर हे एकच यंत्र आल्याने कापणी ते मळणी ही कामे आणखी लवकर होऊ लागली. त्यामुळे धान मळणी झाल्यावरची संजोरी लुप्त झाली. संजोरी म्हणजे निव्वळ सामुहिक जेवण इतकेच त्याचे महत्व नव्हते तर शेतमालक, त्याचे कुटुंब आणि पुरुष मजूर यांच्यातला ऋणानुबंध जपण्याचा एक धागा होता. काळाची पाऊले बदलत असल्यामुळे शेतावरच्या धानपिक मळणीची पद्धत सुद्धा बदलत आहे. त्यानिमित्याने संजोरी गायब झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी