दमा रुग्णांचा मुक्तीदाता वैद्यराज कावळे

मनात प्रामाणिकपणा आणि कसलाही स्वार्थ न बाळगता केलेली जनसेवा मानवास यशोशीखर गाठण्यास सदैव प्रेरणा देते. याच भावनेतून कोकडीचे वैद्यराज प्रल्हाद सोमाजी कावळे तब्बल 40 वर्षांपासून दमा रुग्णांना निःशुल्क औषध देतात. विशेष म्हणजे ही औषध मासोळीमधून देतात आणि फक्त मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी दिली जाते. 

           परंतु गेल्या वर्षी आणि यंदाही कोविड-19 च्या प्रादुर्भावाने जनहिताच्या दृष्टीने त्यांनी दमा औषध वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे

           मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोकडी या गावी वैद्यराज प्रल्हाद सोमाजी कावळे दमा रोगावर मासोळीतून औषध वितरित करतात. गेली 40 वर्षे सातत्याने कोकडीचे वैद्य कावळे निःशुल्क दमा रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करीत आहेत. आजपर्यंत लाखो दमा रुग्णांना त्यांनी दमा औषध दिली आहे. सलग तीन वर्षे औषध घेणे आवश्यक आहे. आजपर्यंत अनेक रुग्णांना दमा रोगातून मुक्त केल्याचे ते सांगतात. अल्पशिक्षित वैद्य प्रल्हाद कावळे गडचिरोली सारख्या जिल्ह्याच्या एका खेडेगावात राहून चार दशकांपासून रुग्णसेवा करीत आहेत. त्यांची ही रुग्ण सेवा प्रशंसनीय आणि वाखाणण्याजोगी आहे. तसेच वैद्यराज प्रल्हाद कावळे यांचे कार्य कोकडीसह गडचिरोली जिल्ह्याला भुषणावह असेच आहे. वैद्य प्रल्हाद कावळेंनी आपल्या सेवाभावी कार्यामुळे स्वतःसह गाव आणि जिल्ह्याचे नाव प्रसिद्धीझोतात आणले आहे. त्यानिमित्त कोकडीचे वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्याशी साधलेला हा संवाद. 

प्रश्न - दमा रोगावर औषध देण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

वैद्यराज कावळे - मला स्वतःला दमा होता. दमा रोग बरा होण्यासाठी मी धडपड करत होतो. एकेदिवशी मी झोपेत असताना मला पडलेल्या स्वप्नाने मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दमा औषधाचे मासोळीतून सेवन करण्यास सांगितले. मी ही गोष्ट लक्षात ठेऊन स्वतःवर सतत तीन वर्षे प्रयोग केला. मी दमा रोगातून बरा झालो. असाच एक प्रयोग गावातील एका व्यक्तीवर केला तो पण बरा झाला आणि दिवसेंदिवस लोक बरे होत गेले. त्यातून माझा आत्मविश्वास खूपच वाढला आणि इथूनच प्रेरणा घेत पुढे मित्रमंडळी, गावकरी, नातलग यांना मी बनविलेल्या दमा औषधी बाबत सांगितलो. प्रारंभी हाताच्या बोटांवर मोजता येतील येवढेच दमा रुग्ण माझ्या घरी येऊन मी दिलेली औषध खाऊ लागले. आज हीच संख्या वाढून लाखाच्या घरात पोहचली आहे. यातच माझे यश आहे असे मी समजतो.

प्रश्न - कोणत्या प्रकारच्या मासोळ्यांचा औषधीकरिता वापर करता?

वैद्यराज कावळे- वर्षातील फक्त मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मी दमा रोगावरील औषध बनवून गणी, भूरभूणा, सारंगी अशा लहान माशांमधून दमा औषध देतो. मी दमा औषध अगदी निःशुल्क वाटप करतो.

प्रश्न - औषधीसाठी कुठून कुठून रुग्ण येतात?

वैद्यराज कावळे- जेव्हा मी दमा औषध देणे सुरू केलो त्यावेळी माझ्या गावातील, आजूबाजूच्या गावचे रुग्ण येऊ लागले. नंतर पंचक्रोशीतील आणि मग आपल्या महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्याबाहेरील दमा रोगी कोकडी येथे येत आहेत. 


प्रश्न - रुग्णसेवेकडे आपण कोणत्या दृष्टीने बघता?

वैद्यराज कावळे - मी पाचवा वर्ग शिकलेला आहे. माझ्या आई-वडीलांच्या संस्कारातून दुसऱ्यांचे चांगले व्हावे हे मी शिकलोय. दमा रुग्णांना होणारा त्रास मी स्वतः अनुभवला आहे. त्यामुळे समाजातील ज्या रुग्णांना दमा रोग झाला आहे त्यांना दमा रोगातून कायमचा मुक्त करणे. याच विचारांवर आजही मी दमा औषध वाटप करतो. म्हणजे दुसऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे हाच माझा मूळ उद्देश आहे. 


प्रश्न - आपल्या सेवाकार्याला कुटुंब, गावकरी आणि शासन यांचे योगदान कसे?

वैद्यराज कावळे - सुरुवातीला मी तयार केलेली औषध खाण्यासाठी पाच-दहा दमा रुग्ण माझ्या घरी यायचे. नंतर दरवर्षी रुग्णांची संख्या वाढत गेली. ही संख्या इतकी वाढली की त्यांना जागेअभावी माझ्या घरी औषध देणे अशक्य झाले. आधी गावातील हनुमान मंदिरासमोर औषध दिले. मात्र आता दमा रुग्णसंख्या लाखाच्या घरात जाताच गावातील स्व. बीसन सहारे यांच्या मालकीच्या वाड्यात औषध दिली जात आहे. जेव्हा मी घरी औषध देत द्यायचा तेव्हा पासून आजपर्यंत माझे कुटुंब माझ्या सोबत आहेत. रुग्ण वाढू लागताच औषधीसाठी मासोळ्यांची व्यवस्था करण्यासाठी दिवसरात्र एक करणारे ढिवर-भोईसमाज, गावात आलेल्या रुग्णांना पाण्याची, राहण्या-खाण्याची, निवासाची सोय करणारे माझ्या गावचे संपूर्ण गावकरी, ग्रामपंचायत, शाळा, लोकप्रतिनिधी, नगरपरिषद देसाईगंज यांचेही सहकार्य मिळते, पोलीस विभाग प्रोटेक्शन देतो. माझ्या गावच्या नागरिकांमुळेच एवढे मोठे सामुहिक आणि सेवाभावी कार्य मी यशस्वी करू शकतो. याचा मला अभिमान आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी