एका हाताने काढायचा पऱ्हा तर दुसऱ्या हाताने खायचा भाकर

जन्मापासून घरात कमी आणि शेतात जास्त बालपण गेल्यामुळे त्यात शिक्षणाचा तर गंध नाहीच परिणामी शेतीवर इतका प्रेम कि प्रसंगी ऊन, वारा, पाऊस, थंडी यातल्या कशाचीही कसलीच तमा न बाळगता इथला शेतकरी रात्रंदिवस शेतीत राबायचा. धानपीक शेती म्हणजे इथल्या लोकांच्या वितभर पोटाला शांत करणाऱ्या अन्नाचा (भाताचा) जणू कारखानाच. तेव्हा खरीप हंगामातील रोवणीच्या सिझनात खाणेपिणे विसरून आपल्या शरीराचा घाम न घाम बळीराजा मातीत अर्पण करायचा. होय, बळीराजा एका हाताने रोवणीसाठी धानपीक पऱ्हा काढायचा तर दुसऱ्या हाताने भाकरीचा तुकडा तोंडात भरायचा. आजपासून पन्नास-साठ वर्षांपूर्वीपर्यंतच्या शेतशिवारातच ज्यांचे अख्खे आयुष्य गेले अशा कणखर मनाच्या आणि दणकट शरीराच्या शेतकऱ्यांची ही खरीखुरी आणि अचंबित करणारी गोष्ट.

              विसोरा गावातल्या जिल्हा परिषद शाळेत सन 1955 ला पाचवा वर्ग सुरू सुरू झाला तेव्हा सहा-सात वर्षाचा असणाऱ्या सलंगटोली येथील मधुकर हनाजी बुद्धे यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला असता त्यांनी थेट सहा-सात दशकांपूर्वीच्या शेती आणि शेतकरी यांच्या विश्वातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते अगदी सहज म्हणाले, आज तुम्ही नाही करू शकत तितकी मेहनत. या त्यांच्या वाक्याने झालेली सुरुवातच तेव्हाची शेती, शेतकरी किती कष्टाळू होते हे जाणवले. विसोरा परिसरात सन 1972 पर्यंत वर्षातून एकदाच खरीप हंगामात धानपीक घेतले जात होते. त्याआधी धानपीक शेती करण्याकरिता ना धानाचे सुधारित वाण होते, ना रासायनिक खत, ना कीटकनाशक होते. धनीक लोकांकडे पाच-दोन ट्रँक्टर होते अन्यथा अस्सल नैसर्गिक आणि पारंपरिक अशा साधन, साहित्यांच्या भरवशावर धानाची शेती सुरू होती. त्यामुळे कुटुंबातील महिला, पुरुष, बालगोपाल सर्वच शेतात काम करायचे.

              वडिलोपार्जित वा स्वतःच्या कष्टाने घेतलेल्या शेतीत बहुतांश शेतकरी धानपीक घ्यायचे. खरीप हंगामाची चाहूल लागताच पेरणीपूर्व मशागत आरंभायची. सूर्याची किरणे जमिनीवर पोहचण्यापूर्वीच शेतकरी शेतावर पोहचायचा. मनाला काय आणि शरीराला काय उसंत नाहीच. जसे दिवाळी आली कि घर आणि घरातल्या प्रत्येक वस्तूला स्वच्छ करून नव्याने सजवले जाते अगदी तसेच शेतातील एकोणएक अनावश्यक काडीकचरा, गवत काढून तसेच शेतजमीनीतल्या मातीचाही उंच-सखल असा भाग सपाट केला जायचा. स्वतः शेतकरी आणि कुटुंबातील सदस्य सोबतीला सर्ज्या राजाची बैलजोडी. नांगरणी होताच धान पेरणी आणि त्यावर पट्टा मारणे. आता वाट फक्त धानपीक पऱ्हे रोवणीचे होण्याची. एकदा काय पऱ्हे रोवणीला आली कि, बळीराजा आणि त्याचा कुटुंब शेतातल्या मातीत जणू एकरूप व्हायचा. फक्त आणि फक्त शेतीसाठी आणि शेतीवरच्या जिवापाड प्रेमाखातर शेतकरी स्वतःला शेतात इतका समर्पित करायचा कि, शेतकरी एका हाताने धानपीकाचा पऱ्हा काढायचा तर दुसऱ्या हाताने भाकरीचा तुकडा खायचा. याला म्हणतात खरेखुरे शेतप्रेम. स्वतःसह कुटुंबातील प्रत्येकाचा वितभर पोट भरण्यासाठीच धानाची शेती करणारा बळीराजा. शेतात राबतांना मात्र तहानभूक विसरायचा. प्रसंगी काम करतांनाच भाकरीचे तुकडे पोटात टाकायचा. शेतकरी परिधान केलेल्या पँटच्या वा बंडीच्या खिशात भाकरीचे तुकडे करून ठेवायचा. आणि पऱ्हे काढतांना वा कोणताही काम करता करताच भाकरीचा तुकडा खायचा.

              पन्नास-साठ वर्षांपूर्वी आजच्यासारखी सुधारित, संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक, कृषी यंत्रे, अवजारे असे सर्वच यंत्र-तंत्र नव्हती त्यामुळे शेतातील सर्वच कामे शेतकरी हा स्वतःसह बैलजोडी, बैलगाडी यांच्यासाथीने करायचा. त्यात भगीरथ परिश्रम करायचा तो शेतकरी. दिवस-रात्र त्याच्या डोळ्यासमोर केवळ शेती, पीक याशिवाय दुसरे काहीच नसे. शेतकऱ्याच्या भोवती त्याचा कुटुंब फिरत असायचा. पण बळीराजा जसा नांगरणी, वखरणी, चिखलणी याकामी बैलजोडीला जुंपायचा तसा शेतकरी स्वतःच स्वतःला शेताला जणू जुंपुन टाकायचा. अंगातील घामाचा थेंब न थेंब मातीत गाळायचा. यालाच झाडीपट्टीच्या झाडीबोली भाषेत ढोर मेहनत म्हणतात. आजची शेती आणि शेतकरी आधुनिक झालेली आहे. तरीही आजचा शेतकरी मेहनत करतोच आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी