श्रावणातली भजन-गायन परंपरा देतेय आध्यात्मिक ऊर्जा
श्रावण मासात सण-उत्सवांना उधाण येतो. निसर्ग, मानवासह अन्य प्राणी आणि वनस्पती यांच्यातील नैसर्गिक बंधन अधिक घट्ट करणारे सण श्रावणात येतात. मनुष्य हा निसर्ग, प्राणी आणि वनस्पती यांची भाव-भक्तीने पूजा-अर्चा वंदन करून नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळगौरी, जन्माष्टमी, बैल पोळा हे सण मोठ्या आनंदात साजरे करतो. आध्यात्मिक, धार्मिक भावना वृद्धिंगत करणाऱ्या या श्रावण महिन्यामध्ये खेड्यापाड्यात पिढ्यानपिढ्या अभंग, भजन, गौळण गायनाची अनोखी, गौरवशाली परंपरा आजही सुरू आहे. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर, विसोरा येथे शंभरावर वर्षांपूर्वीपासून ही परंपरा कायम असून सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव तेवत ठेवण्यात मोलाचे कार्य करीत आहे.
पूर्वी गावात मनरंजन वा जनरंजन करण्याची आजच्या सारखी टीव्ही, मोबाईल, अँप्स अशी हजारो साधने नव्हती. त्यावेळी मानवी समाजातील काही हौशी लोकच आवडीने छंद जोपासून स्वतःसह सर्वांचे करमणूक करीत असत. मराठी वर्षातील गुढीपाडवा ते होळी पर्यंतचा प्रत्येक सणवार धार्मिकता जोपासणारा असल्यामुळे लोकांच्या भावविश्वात त्यांना विशेष स्थान आहे. त्यात श्रावण महिन्यात एकापाठोपाठ एक सण येत असल्याने भक्ती भावाची जणू लाट पसरते. फार आधीपासून शंकरपूर, विसोरा या गावी श्रावण महिनाभर भजन, गौळण गायन करून परमेश्वराची आराधना केली जात आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात कि, श्रावण महिना आरंभ होण्याच्या आधीच गावातील भजनी मंडळी, भाविक भक्त तथा नागरिक एकत्र येत आणि महिन्याचे नियोजन ठरत असे.
श्रावणारंभ होताच सायंकाळी गावातल्या एखाद्या घरी वा मंदिरात लोक जमा होत. आणि पुजापाठ आटोपून गणेश स्तवनाने कार्यक्रम सुरू व्हायचा. गायनाची आवड असणारे गायन, वाद्य वाजवणारे वादन करीत तसेच साथ देणारे आणि ऐकणारे नागरिक असा बराच मोठा समुदाय होत असे. महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली असल्याने संतांचे अभंग, प्रसिध्द कवींचे भजन, चित्रपटातील भावगीत गाऊन भगवंताचे नामस्मरण केले जात आहे. पूर्वी ढोलक, तंबोरा, रामताळ्या त्यानंतर पखवाज, पेटी, टाळ आणि आता तबला, पेटी, मंजिराच्या तालावर अभंग, भजन गातात. यात संगीतातील वेगवेगळ्या रागांचा समावेश असलेले अभंग, भजन, गौळण गाऊन रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम रंगतोे. सध्या आठवड्यातील सोमवारी, शनिवारी भजन गायन सुरू आहे. त्यामुळे श्रावणामध्ये गावखेड्यात भक्ती रसाचा विडा रंगतो आहे. सामूहिकरित्या भजन गायनाची ही प्रथा कमी प्रमाणात का असेना पण सुरू आहे.
सर्वधर्मसमभाव आणि ऐकतेचे अतूट बंधन-
गावात विविध जाती आणि धर्माचे लोक राहतात. श्रावण महिन्यामध्ये फार पूर्वी पासूनच सर्व जातीधर्माचे लोक या सोहळ्यात सहभागी होत आले आहेत. आणि आताही ती परंपरा चालू आहे. इथे फक्त ईश्वराची भक्ती हीच एकमेव जात आणि धर्म समप्रमाण मानून भजन गाण्याची मैफल रंगते. गरीब वा श्रीमंत असाही त्यात भेदभाव केला जात नाही. गावामध्ये वास्तव्यास असलेल्या तसेच बाहेर गावाहून आलेल्या आमंत्रित भजनी मंडळींना सुद्धा या श्रावणात विशेष मान असतो. गावात श्रावण महिन्यातील ही परंपरा टिकवून ठेवण्यात या भजनी मंडळींची एकी वाखाणण्याजोगी आहे. श्रावण आला कि एका वेगळ्याच भक्ती भावाने हा समुदाय तयार होतो. एकत्र आल्यावर आवडीनुसार गायन, वादन होत असते. या मंडळींमध्ये असलेल्या एकतेतून भक्ती भावाचा सूर एका वेगळ्याच उंचीवर पोहचतो. हे सर्व लोकांमध्ये असलेल्या सर्वधर्मसमभाव आणि एकता या गुणांमुळे शक्य होत आहे.
आवड, उत्स्फूर्तता आणि सहकार्य हाच पाया-
आवड असलेले कार्य केल्यास मनाला शांती लाभते. धार्मिक असो कि आध्यात्मिक भावना असलेले सर्वच व्यक्ती भक्तिभावाने आराधना करतात असे नसते. परंतु काहींना अभंग, भजन, गौळण वा भावगीत गाऊन आराधना करायची इच्छा असते. त्याच भावनेतून अनेक पिढ्यांनी ही परंपरा सुरूच ठेवायला स्वतःला त्यात गुंतवून टाकले आहे. आजही वयाची साठी सत्तरी ऐंशी ओलांडलेली मंडळी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असतात. स्फूर्ती आणि उत्सुकता असल्याने ही गौरवशाली परंपरा जिवंत आहे. एकमेकांना सहकार्य करून महिनाभर चालणाऱ्या या उत्सवात सातत्य ठेवले जाते.
पाठांतर आणि दुसऱ्यांकडून शिकण्याची वृत्ती प्रशंसनीय-
आज संगीत शिक्षण तालुका पातळीवर घेणे शक्य आहे. गेल्या पन्नासवर्षांपूर्वी गावात तर सोडाच तालुक्याच्या ठिकाणी पण या सुविधा उपलब्ध नव्हत्या तेव्हा गायन आणि वादन शिकणे शक्य होत नव्हते. आर्थिक, दळणवळण, मार्गदर्शन अशा अनेक समस्यांचा डोंगर उभा होता. म्हणून गावातील वा गावानजीकचा किंवा नातेवाईक गायन, वादन यात पारंगत असेल. त्याच्या कडून अन्यथा पाहून, ऐकून स्वतःच शिकावे लागत असे. गावातील बुजुर्ग मंडळी भजन गायन वादन करीत त्यावेळी बालगोपाल, तरुण त्यांच्या समवेत बसत आणि तिथूनच गायन आणि वादन शिक्षण संक्रमित व्हायचे. सोबतच शेकडो अभंग, भजन, गौळण मुकपाठ असत. वारंवार कानांवर पडणाऱ्या आवाजामुळे आपोआप भजन पाठांतर होत. शिक्षणाच्या आलेखावर एकही वर्ग उत्तीर्ण नसलेले परंतु शेकडो भजन, अभंग, गौळण पाठ असलेले अनेक कलावंत खेड्यात आहेत. जेव्हा न पाहता भजन, अभंग मुखातून बाहेर पडतात तेव्हा शिक्षितांना सुद्धा अचंबित व्हावे लागते.
दोनतीन दशकांपूर्वी श्रावण महिना आल्यावर गावातील लोक धार्मिक भावनेच्या आंतरिक उर्मीने, ओढीने आणि एकमेकांवर असलेल्या जबाबदारीने भजन गायनाकडे आपोआप खिचला जात होता. मात्र आताची तरुण मंडळी त्या प्रमाणात धार्मिकता जोपासतांना दिसत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. ऐंशी वर्षांचे विसोराचे सुप्रसिद्ध पेटीमास्तर राजीराम वझाडे बोलले कि, लोकांच्या मनोविचारांत खूप बदल झाल्याने सध्या आधीसारखा श्रावणातला माहौल राहिलेला नाही.
खुपच छान.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा