विसोरा येथे ११९ वर्षांपूर्वीच आरंभले गुरुजींचे ज्ञानदान
समाजात आजही शाळा, शिक्षण आणि गुरुजी यांच्याविषयी आकर्षण, आदर आणि प्रेम कायम आहे. आजपासून तब्बल ११९ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या विसोरा येथील आधीच्या मराठी माध्यमिक आणि आताच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत शंभरावर गुरुजींनी पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांना शिकविले आहे. गुरुला वंदन करण्याचा नव्हे दुसऱ्यांचे जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी धडपड्या आणि समर्पित वृत्तीचा सन्मान करण्याचा दिवस अर्थात राष्ट्रीय शिक्षक दिन. गेल्या एकशे एकोणविस वर्षांत विसोराच्या जि. प. शाळेत ज्ञानदानाचे पवित्र आणि उदात्त कार्य केलेल्या गुरुजींच्या अविस्मरणीय आठवणींना त्यांच्याच शिष्यांनी दिलेला हा उजाळा. राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून या शाळेतून शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांशी बातचीत केली असता त्यांच्या मनात साठलेल्या, जपलेल्या आठवणी आणखीनच ताज्या झाल्या.
भारत स्वतंत्र होण्याच्या ४५ वर्षांपूर्वीच विसोरा येथे शाळा उभारली गेली. नुकताच एकोणिसावा शतक संपून एक वर्ष झाला होता आणि विसाव्या शतकाच्या दुसऱ्याच वर्षी विसोरा येथे मराठी शाळेचा श्रीगणेशा झाला. विसोरा गावासाठी ही अत्यंत गौरव आणि भाग्याची बाब म्हणावी लागेल कि ब्रिटिश शासनकर्त्यांनी इथे शिक्षणाची सोय केली. आताच्या देसाईगंज तालुक्यातील सर्वांत जुनी अशी ही मराठी माध्यमाची शाळा. १९८० पूर्वी आताची जिल्हा परिषद केंद्र शाळा, मराठी माध्यमिक शाळा म्हणून नावारूपास होती जिथे आठवी पर्यंत शिक्षण होते. पंचक्रोशीत विसोरा येथे १९५३-५४ पासून माध्यमिक शाळा त्यापूर्वी चौथीपर्यंतच शाळा होती अशीही माहिती मिळाली. विसोरा येथेच शाळा असल्याने आजूबाजूच्या परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेतले आहे. आणि विविध क्षेत्रात नावलौकिक केला आहे.
याच शाळेत सन १९५९ ला सातवी उत्तीर्ण झालेले ऐंशी वर्षांचे राजीराम वझाडे आजही शाळा आणि शिक्षकांच्या अनेक गोड आठवणी सांगतात. त्यांना कबड्डी खेळायला खूप आवडत असे. हिवाळ्यात खेळण्याचा हंगाम सुरू झाला कि, खेळ घेणारे शिक्षक रामपुरकर आणि विद्यार्थी पहाटे चार वाजता उठून नदी पर्यंत धावत आणि परत येऊन शाळेच्या पटांगणात कबड्डी, खोखो खेळ खेळत, असे ते सांगतात. आपल्या गुरूंनी शिस्त आणि अभ्यास यावर भर दिल्याने मी पेटी मास्तर घडलो असे ते म्हणाले. तब्बल चाळीस वर्षे झाडीपट्टीच्या हौशी रंगभूमीला सजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अख्ख्या झाडीपट्टीत एक सुप्रसिद्ध पेटिमास्टर म्हणून राजीराम वझाडे यांचे नाव आदराने घेतले जाते.
सीताबर्डी येथील ८१ वर्षांचे रामराव फाये आजही इयत्ता चौथीत (सन १९५०) शिकलेल्या 'कीर्तनास नर हो तुम्ही जागा' या कवितेच्या भावार्थाला मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवले असून त्याचे अनुकरण करून स्वतःच्या जीवनात आचरणात आणतात. परीक्षा जवळ येताच दररोज पहाटे चार वाजता उठून गुरुजींच्या घरी अभ्यास करायला जायचे. त्यावेळी सकाळी जी प्रतिज्ञा गायली जात होती. तीच प्रतिज्ञा वयाच्या ८१ व्या वर्षीही ते गातात, हे विशेष! कांबळी गुरुजी यांची आठवण ते आवर्जून काढतात. टोपी घालून शाळेत येणाऱ्या शिक्षकांची प्रचंड आदरयूक्त भीती वाटत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, गावात गुरुजीला खास स्थान आणि मान मिळायचा. आता त्यात खूप बदल झाल्याचे ते बोलले.
शाळेला एकशे एकोणविस वर्षे झाले असले तरी ४ एप्रिल १९३२ च्या पूर्वीचा रेकॉर्ड सध्या शाळेत नाही. त्यानंतरचा रेकॉर्ड सुस्थितीत आहे. परिणामी प्रारंभी शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या पिढीतील वंशजांना शाळा शिकल्याचा वा शाळा सोडल्याचा दाखला हवा असल्यास त्याची नोंद नाही असा शेरा आता दिला जातो. अशी माहिती मिळाली आहे. त्यातील एका पानावर गण्या या मुलाची शाळेत दाखल केल्याची नोंद असून त्याच ठिकाणी प्रेसीडेंट, पालक, आणि हेडमास्तर यांच्या सह्या आहेत. ३० डिसेंबर १९३२ या तारखेला देवाजी विठोबा हेडमास्तर होते अशी नोंद केली आहे. म्हणूनच ११९ वर्षांत नेमक्या किती शिक्षकांनी येथे आपली सेवा दिली हे कळू शकले नाही. मात्र विसोराच्या या विद्यामंदिरात आलेल्या शेकडो गुरुजनांच्या कडू, गोड स्मृती आजही इथल्या विद्यार्थ्यांच्या मनात रुंजी घालत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा