झाडीरंगभूमीच्या राजधानीत नाट्यचैतन्य

मंडई आणि नाटक म्हणजे झाडीपट्टीच्या लोकांचा सण. मनोरंजनाची लक्षावधी साधने असली तरी झाडिच्या रसिकांना नाटक पाहल्याशिवाय चैन पडत नाही. आता पुन्हा दुसऱ्यांदा आठ-आठ महिन्यांच्या निर्बंधानंतर नाटक हंगाम सुरू होण्यापूर्वीच शासनाने नाटक क्षेत्र खुले केले. झाडीपट्टी रंगभूमीची राजधानी देसाईगंज येथे नाट्य कंपन्यांचे दुकाने सजू लागली आहेत. नाटक तालमी सुरू झाल्या, नाटकांचे बॅनर झळकू लागले आणि नाटक बुकिंग सुरू झाल्याने नाटक हंगामाची जणू नांदीच सुरू झाल्याचे मानले जात आहे. एका महिन्यानंतर नाटकाचा पडदा उघडणार म्हणून निर्माता ते गाडीवाले आणि कलावंत ते रसिक या सर्वांत उत्सुकता वाढली आहे.

                 मार्च 2020 मध्ये नाटकाचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना कोरोनाच्या महामारीने संचारबंदी लागली. या महामारीचा कलाकार अदृश्य आणि जीवघेणा असल्याने कोरोनारुपी नाट्याच्या प्रभावाने पहिल्यांदा जवळपास आठ महिने नाट्यक्षेत्र बंदिस्त झाले. त्यामुळे वर्ष 2020 मधील दिवाळी पासूनच्या हंगामाची ऑगस्ट-सप्टेंबरपासून सुरू होणारी पूर्वतयारी झालीच नाही. 4 नोव्हेंबर 2020 ला शासनाने नाटकांना सूट दिली. अखेर दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज सणाला खास मंडईनिमित्त गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा जमीनदारी या खेडेगावात आयोजित नाटक प्रयोगाने झाडीच्या रंगभूमीवरील नाटकांचा श्रीगणेशा झाला. त्यावेळी नाटकाच्या पॉम्प्लेटवर प्रथमच चक्क कोरोना नियम छापले गेले होते, हे विशेष. पण नाटकाच्या आयोजन आणि पाहण्यास रसिकांना उत्साह जरी असला तरी कोरोनाच्या भीतीने पाहिजेत तसा उत्स्फूर्त प्रतिसाद नाटकांना मिळाला नाही.

                 केवळ पाच-सहा नाट्यकंपन्या सुरू झाल्या त्यांच्याच नाटकांचे बुकिंग झाल्याने 100-110 एवढेच प्रयोग त्या हंगामामध्ये झाले. उरलेल्या 40 ते 50 नाट्य कंपन्या उघडल्याच नाही. म्हणजे साडेतीन हजार नाटक प्रयोगातून हजारोंना रोजगार देणारी झाडीपट्टी रंगभूमी ठप्प पडली. कोट्यावधी रुपयांची उलाढाल झालीच नाही. नाटक लेखक, निर्माता, दिग्दर्शक, डेकोरेशन, नेपथ्य, कलावंत, गायक-वादक, प्रॉम्प्टर, गाडी मालक-चालक तसेच नाटकांच्या शामियान्यात चणे, वाटाणे-फुटाणे, नड्डे विकणारे तसेच शामियान्याच्या बाहेर लहान-मोठे दुकाने थाटून टपरीवर चाय विकणारे या सर्वांचाच रोजगार बुडाला.

                 झाडीपट्टीचा थरार शंकरपट आता बंद झाल्याने मंडई निमित्त नाटकांचे आयोजन केले जाते. परंतु मंडई पण अनेक गावात भरली नाही. नाटक पण झाली नाही. शासनाने परवानगी देऊनही तालुका, गाव प्रशासनाने परवानगी नाकारल्याचे प्रकार घडले. परिणामी मंडई मधील शेकडो दुकाने थाटणाऱ्या हजारो लोकांचा रोजगार कोरोनाने हिसकावला. एकूणच झाडीपट्टी रंगभूमी गजबजली नाही. नाटक आयोजनातून रोजगार मिळणारे सर्वच तसेच छोट्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. मात्र शासनाने नोंदणी केल्यावर निवडक कलावंतांना पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. परंतु नोंदणी अभावी, असंघटितपणामुळे मंडई, नाटकानिमित्त लहान-मोठे दुकान लावणाऱ्या व्यावसायिकांना सरकारी मदत मिळू शकली नाही व त्यांचा कोणी विचारच केला नाही. कोरोना लॉकडाऊन आणि निर्बंध या काळामध्ये अनेक कलाकारांनी भाजीपाला विकणे, पानठेला चालवणे, कपडे प्रेस करणे, रोजंदारी करणे, सेल्समन म्हणून काम करीत पोट भरला.

                 आणखी नाटकांचा हंगाम संपण्यापूर्वीच मार्च 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. नाटकांवर कडक निर्बंध लादण्यात आले. पुन्हा दुसऱ्यांदा जवळपास आठ महिने प्रतीक्षा केल्यावर आता कुठे नाटकांना निर्बंधमुक्त करण्यात आले. या महिन्यातील 22 तारखेपासून नाटक सादर करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. पण यावेळी कोरोनाची भीती कमी असल्याने नाट्यलेखक, निर्माता, कलावंत यांनी आधीपासूनच नाटक प्रयोग लेखन, तयारी, निवड, तालमी सुरू केल्या. आता नाटकांचे रंगीबेरंगी फोटो, नावे असलेली मोठाले फलक वडसा-देसाईगंज येथील लाखांदूर आणि ब्रह्मपुरी मार्गावरच्या नाटक कंपन्यांच्या दुकानावर लावलेले दिसत आहेत. तसेच रस्त्याकडेला नाटकाचे बॅनर मांडल्या जात आहेत. नाटकांच्या कंपन्या सुरू झालेल्या आहेत. नाटकांचे बुकिंग सुरू सुद्धा झाले आहे. आयोजक आणि रसिकांकडून नाटकांच्या आयोजनासाठी उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे कळते.

                 एकूणच झाडीपट्टी रंगभूमीचे मागील सलग दोन नाटक हंगाम अपूर्ण राहिल्यानंतर यंदा सारेकाही पूर्वपदावर आल्यानंतर शासनाने कोरोना निर्बंधातुन बाहेर काढले. तेव्हा नाटकांना उत्तम प्रतिसाद लाभेल यात शंका नाही. म्हणून नाट्यप्रेमी आणि रसिकांना नाटकांच्या हंगामाची आणि सोबतच मंडईची उत्सुकता शिगेला पोहचली असल्याची दिसत आहे. अनेक गावांमध्ये मंडई वा विशेष दिनी आयोजित नाटक हे नाट्य कंपन्यांकडून चाळीस ते सत्तर हजार रुपये मोजून घेतले जाते. तर बहुतांश गावात हौशी नाटक प्रेमी आयोजन आणि अभिनय करतात. झाडीपट्टीतील काही गावे सोडल्यास नाटक होतेच. हि शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा असून कोरोनाने प्रथमच दोनदा झाडीरंगभूमीला बाधित केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी