शंकरपटाचा धुराळा उडणार कां?

बैल हा कृषी संस्कृतीतील अत्यंत जिवापाड जपला जाणारा पूजनीय पाळीव प्राणी. त्याच बैलातील चपळाई, वेग आणि मनोरंजनापोटी बैलांच्या शर्यती म्हणजेच पूर्व विदर्भातील झाडीपट्टीच्या शंकरपट सुरू झाल्या. शंकरपटाला शतकोत्तर परंपरा आणि प्रचंड लोकप्रेम लाभले. शंकरपट म्हणजे झाडीपट्टीचा थरार नव्हे जणू उत्सव म्हणून साजरा केला जायचा. मात्र ग्रामीण संस्कृती आणि अर्थव्यवस्था बळकट करण्यात मैलाचा दगड ठरणारी शंकरपट बंद झाल्याने बैलप्रेमी, शंकरपट शौकिन हिरमुसले आहेत. पशुधन कमी झाले, पटाचा माहौल, मजा इतिहासजमा झाली. त्यामुळे झाडीपट्टीची शान आणि खरीखुरी ओळख असलेल्या शंकरपटाचा धूराळा उडणार का असा मानस पटप्रेमींनी व्यक्त केला आहे.

                  गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांचा घनदाट झाडाझुडुपांचा भूपट्टा म्हणजेच झाडीपट्टी होय. तब्बल 58 लाख लोकसंख्येच्या आणि तीसहजारांवर चौरस किमी क्षेत्रफळाच्या या पट्ट्यात लक्षावधी हेक्टर जमीनीवर धानशेती केली जाते. यावरून आपणांस कळेल हा पट्टा म्हणजे निसर्ग पूजक, शेतीप्रेमी लोकांची खाण आहे ते. वीस वर्षांपूर्वी शेती भरपूर त्यामुळे शेतीमशागतीसाठी बैल भरपूर. ग्रामीण भागात खरीप हंगामाचा धानपीक कापून, चूरून घरी आला कि मग शेतकरी आणि लोकांना वेळच वेळ असते. त्याचदरम्यान शेकडो वर्षांपासून वर्षातून एकदा प्रत्येक गावात मनोरंजनासाठी दिवसा शंकरपट आणि रात्री दंडार, नाटक आयोजित करत. शंकरपट पाहायला अलोट गर्दी उसळायची. गावाच्या बाहेर एक किलोमीटर लांब पटाची दाण तयार करत. बैलजोडी जुंपलेल्या दोन गाड्या. उभ्या सरळ रेषेत आडव्या काही अंतरावरुन समांतर धावत. बैल सुसाट पळत. गाडा हाकणारा कातकर हा त्यातील मुख्य भूमिकेत असायचा. एकदा शर्यतीचा घंटानाद झाला कि, लोकांचा जणू आक्रोश, आवेश आणि उत्कंठा. दोन दाणीवर प्रत्येकी दोन-दोन बैल, एक-एक गाडा आणि कातकर यांच्यातील लक्षवेधी हालचाली, तुतारीचा वार त्यातच बैलांच्या पायांची भिरभिरणारी झेप. गोलगोल वेगाने फिरणारे गाड्यांच्या भोवऱ्या (चाक). प्रत्येकच क्षण थरारक असायचा. शर्यत संपेपर्यंत त्यातला हरएक क्षण अन क्षण आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी सारे प्रेक्षक प्रचंड एकाग्रचित्त असत. पण आरडाओरडा तर असायचाच. कल्लोळ अन कल्लोळ तरीही डोळ्याची पापणी हलायची नाही. इथल्या लोकांच्या मनामनात आणि हृदयाच्या खोल कप्प्यात जागा केलेल्या उत्सवात शंकरपट होती. शंकरपट म्हणजे झाडीची शान.

                  पण शंकरपट बंद झाल्याने हा सारा थरार इतिहास झाला आहे. शंकरपटाने ग्रामीण संस्कृती, परंपरा कायम ठेवण्यात मदत केली. शंकरपट निमित्त्याने कितीतरी लोकांचे लग्नजुडले. शंकरपट म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीला माहेरची ओढ आणि भेट घडवून आणणारे निमित्त आणि माध्यम होते. अनेक महिने, वर्षांनी नातलग भेटत. मानपान आणि खुप काही. वर्षातून एकदा शंकरपट भरत असे. शंकरपट इथल्या लोकांचा सण. त्या दिवशी भरणाऱ्या बाजारात सबंध शेतीला लागणारे घरगुती सामान मिळत. पंचक्रोशीतील राज्याबाहेरील पट शौकिन भेट देत. पटाच्या बैलांना पैलवानाला लाजवेल असा खूराक खाऊ घालतात.

                   शंकरपट बंदीने पशुधन कमी झाले. शंकरपटाच्या निमित्त्याने चांगल्या दर्जाच्या बैलासाठी गाय पालन केले जात होते. दुकाने सजत त्यांचा हंगामी रोजगार गेला. शंकरपट म्हणजे झाडीपट्टीचा आनंदोत्सव होता. आता ती मजा राहिलेली नाही असे अनेकजण बोलून दाखवतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी