किन्हाळावासीय जतन करताहेत राष्ट्रसंतांची प्रार्थना
समस्त समाज-राष्ट्राचे सर्वांगीण आरोग्य उन्नत करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांनी मानवी शिक्षणाची शाळा म्हणजेच सामुदायिक प्रार्थना मानवी समुदायाला अर्पण केली. त्याच सामुदायिक प्रार्थनेची बहुमूल्य अशी शिकवण देसाईगंज तालुक्यात किन्हाळावासीय तब्बल 58 वर्षानंतरही जपत आहेत. विशेष म्हणजे, किन्हाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार-प्रेरणेतून दररोज सामुदायिक प्रार्थना केली जाते. राष्ट्रसंत यांच्या भेटीने आणि स्पर्शाने पावन झालेला किन्हाळा गावात स्मृती दरवळत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नदी गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा गावातील मोतीराम ठाकरे यांचे जोगीसाखरा येथील मानकर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्या संबंधापोटी मोतीराम ठाकरे यांनी मानकऱ यांना आग्रह केला की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना किन्हाळा गावात, घरी भेट द्यायला आणा. मानकर यांनी मोतीराम यांचा शब्द मानला आणि योगायोगाने राष्ट्रसंत कुरखेडा तालुक्यातल्या आंधळी येथील हरिराम खुणे यांच्या घरी आले होते. महाराजांनी ठरवले की किन्हाळा येथे मोतीराम ठाकरे यांच्या घरी भेट द्यायची म्हणून ठरवले आणि तो दुर्मिळ असा राजयोग सन 1964 ला जुळून आला.
महाराज आंधळी वरून मोहटोला नंतर किन्हाळा येथे आल्यावर मोतीराम ठाकरे यांच्या घरी भेट दिली. राष्ट्रसंत मोतीराम ठाकरे यांच्या घराच्या दारासमोर येताच ठाकरे यांनी महाराजांचे पाण्याने पाय धुतले. त्यावेळेस ठाकरे यांनी पाय धुतल्यावर महाराजांचे पाय पुसण्यासाठी दुपट्टा नव्हता त्यावेळेस महाराज गंमतीने ठाकरेंना म्हणाले की, पाय धुतले आणि पाय कोण पुसेल? त्यानंतर दुपारला भजनाचा कार्यक्रम झाला. पुढे प्रस्थान झाले.
किन्हाळा येथील मोतीराम ठाकरे हे धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे कीर्तनकार, भागवतकार गावात आल्यास नागरिक त्यांना सांगत मोतीराम ठाकरे यांच्या घरी जा. मोतीराम ठाकरे यांच्याच अतीव श्रद्धेपायी राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने किन्हाळा येथील भूमी धन्य झाली. राष्ट्रसंत यांच्या जुन्या आठवणी सांगताना त्या वेळेस अगदी लहान असलेले मोतीराम ठाकरे यांचे पुत्र श्रीराम ठाकरे सांगतात की, महाराजांनी सामुदायिक प्रार्थना सुरू ठेवा आणि सामुदायिक प्रार्थनेचे जतन करा असा संदेश दिला. महाराजांचा तो शब्द प्रमाण म्हणून तेव्हापासून किन्हाळा, मोहटोला येथील नागरिक सामुदायिक प्रार्थनेची आराधना करतात.
गाढवी नदीच्या पात्रापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर तेव्हाचा जुना किन्हाळा गाव वसलेला होता. त्या गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोतीराम ठाकरे यांच्या ज्या घरी भेट दिली, तो घर आजही उभा आहे. घर अजूनही पाडला नाही.
मोतीराम ठाकरे यांच्या समवेत आत्माराम बर्डे, हिरामण ठाकरे, लक्ष्मण नाकाडे यांनी राष्ट्रसंत यांचे आदरातिथ्य केले. वर्तमानात गुरुदेव सेवा मंडळ, किन्हाळा, मोहटोला येथील श्रीराम ठाकरे, रघुनाथ बुल्ले, देवराव बघमारे, दयाराम ठाकरे, कलीराम ठाकरे, नीलकंठ भर्रे, पुंडलिक ठाकरे, केवळराम ठाकरे परंपरा चालवीत आहेत. उद्या (दि. 28) देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा