शंकरपट म्हणजे झाडीपट्टीचा लोकोत्सव
शंकरपट म्हणजे झाडीपट्टीचा उत्सव. शेतकऱ्यांचा सण. शंकरपट आहे हे माहित होताच शेतकरी कामाला लागायचा. ज्याच्या घरी पटावर धावण्यासाठी बैलजोडी असायची ते स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे बैलांची काळजी घ्यायचे. त्याची वज (पालनपोषण) करायचे. पट जशी पण जवळ येत होती तसतशी बैलाच्या जोड्या आणि त्यांची तयारी, सराव करून घेण्याची जी लगबग होती ती वाढायची. गावात चैतन्य तयार व्हायचा. झाडीपट्टीतील गावात शंकरपट आहे म्हटल्यावर नाटक आलेच. नाटक म्हटल्यानंतर पाहुणे आले आणि पाहुणे म्हटल्यानंतर पाहुण्यांचे मेजवानी आलीच. आणि विशेष बाब अशी की शंकरपट, नाटक म्हटल्यानंतर लग्न जुळण्यासाठी मुले आणि मुली पाहण्याचा एक आगळावेगळा कार्यक्रम यानिमित्ताने साधला जायचा.
खरिपाच्या हंगामातील धानपिकाची मळणी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापर्यंत चालू राहायची. याला कारण असे होते की, पूर्वी ट्रॅक्टर, मळणी यंत्र नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील धानपिकाची कापणी झाल्यानंतर धानाची मळणी करण्यासाठी बैलजोडी, बैलगाडीचा वापर करावा लागत होता. त्यामुळे महिनोनमहिने मळणी चालायची. मळणी करून धानरास घरी येईपर्यंत डिसेंबर महिना उजडायचा. एकदा धानरास घरी आली की, शेतकरी हरखून जायचा. शेतकऱ्याला, लोकांना विरंगुळा, मन-जन रंजन म्हणून वेध लागायचे झाडीपट्टीच्या शंकरपट आणि नाटकांचे. सोबतच घरातल्या मुला-मुलींचे लग्न जोडण्यासाठी सुद्धा लगबग वाढायची. यासाठी मकरसंक्रांतीचा मुहुर्त साधून झाडीपट्टीतील गावागावांमध्ये शंकरपट, नाटके व्हायची.
एकदा गावात पट ठरल्यावर जणू सारा गाव कामाला लागायचा. गावालगतच्या, बाहेरच्या एक ते दोन किलोमीटर सरळ अशा परिसरामध्ये एकाचवेळेस पाचसहा फूट अंतरावरून समांतर सरळ दोन बैलजोड्या धावू शकतील अशा दाण तयार करत. बैलांच्या शंकरपटसाठी गावात प्रमुख, अनुभवी अशा व्यक्तींची पट समिती तयार केली जायची. त्या समितीकडे पटाची संपूर्ण जबाबदारी असायची. पटासाठी खास राखीव जागा सुद्धा ठेवल्या जात होती. केवळ आणि केवळ सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक परंपरा वारसा म्हणून गावागावांमध्ये शंकरपट आणि नाटक भरवल्या जायच्या.
शंकरपट आणि नाटकाच्या निमित्ताने अनेक मुला-मुलींच्या लग्नगाठी बांधल्या जात. पटाच्या माध्यमातून त्या गावाशी आणि तेथील लोकांशी नात्यांची घट्ट विण तयार होत असे. त्यानिमित्ताने अनेकांच्या घरी पाहुणे यायचे. नुकताच लग्न झालेले नवीन जावई आपल्या सासरी आणि मुलगी आपल्या माहेरी यायची. दिवसा शंकरपट, बाजार रात्री नाटक आणि सकाळी पाहुण्यांची मेजवानी. गावाला जणू आनंदाचा उधाण आलेला असायचा. गावात एक आनंददायी, आनंदमय वातावरण पसरला जायचा. गावातच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील पंचक्रोशीत एक वेगळाच माहौल तयार होत असे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव जवळील देलनवाडी येथे पट भरायची. झाडीपट्टीचे दादा कोंडके डॉ. परशुराम खुणे सांगतात की, देलनवाडी येथे भरवल्या गेलेली पट म्हणजे झाडीपट्टीतील शंकरपटाचा श्रीगणेशा समजला जायचा. येथील पट भरल्यानंतरच झाडीतल्या विसोरा, कुरुड, नवेगावबांध, गुरनोली अशा अनेक गावातील शंकरपट आणि नाटका सुरू व्हायच्या. देलनवाडी येथील जुन्या आठवणी सांगताना डॉ. खुणे सांगतात की, गावांमध्ये स्पीकरवाले प्रसन्न वातावरण तयार करून टाकायचे. पूर्वी आताच्या सारखी डिजिटल बॅनर तयार करण्याची यंत्रणा किंवा पद्धत नव्हती त्यामुळे पेंटर लोक स्वतःच्या हाताने नाटकांचे बोर्ड रंगवायचे आणि तेच बोर्ड नाटकप्रेमी मंडळी गावांमध्ये फिरवायचे. नाटकासाठी मुंबईचे कलाकार, हिरो गावात येणार आहेत असे माहीत होताच गावातीलच नव्हे तर गावाबाहेरचे अनेक रसिक नाटक पाहायला यायचे. गावामध्ये खूपच सुंदर वातावरण तयार व्हायचा.
मात्र आता तब्बल सात वर्षांनंतर झाडीपट्टीच्या शंकरपटाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवी झेंडी दिली आहे. पण मधल्या काळात शंकरपट बंद होती. आता लोकांकडे बैलजोड्या नाहीत. पशुधन कमी झाले आहे. आता ग्रामीण चित्र बदलले. यंत्रयुग आलेला आहे. शेतीच्या मशागतीकरिता ट्रँक्टरला सर्वोच्च प्राधान्य दिला जातो. बैलपोळ्याला हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या बैलजोड्या दृष्टीस पडतात. ट्रँक्टरने शेतीची कामे केली जातात. त्यात आता धान मळणी पण यंत्रानेच केली जाते. त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली. त्यात पट पण बंद झाली होती. कदाचित पट बंद झाल्याने बैल पोसणे कमी झाले असेल. मात्र आता पुन्हा पट सुरू होणार आहे. तेव्हा वीस-पंचवीस वर्षांपूर्वी झाडीच्या शंकरपटाचा जसा जोश होता, धुराळा उडायचा अगदी तसाच जोश तोच माहौल पुनश्च नव्याने झाडीपट्टीच्या शंकरपटाने झाडीपट्टीच्या प्रदेशामध्ये तयार होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि आता सात वर्षानंतर इथला रसिक इथला शेतकरी नेमका कशा प्रकारचा प्रतिसाद शंकरपटाला देतो. हे सर्वच पाहणे प्रचंड उत्सुकतेचे, औत्सुक्याचे ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा