जागृत देवस्थान आमगावचे राममंदिर
प्रभू श्रीरामावर अपार श्रध्दा आणि जिवापाड प्रेमाखातर बजरंगबली हनुमानाने अथांग सागरात सेतू बांधला. इकडे गडचिरोली जिल्ह्यातील आमगावच्या जंगलात आजपासून तब्बल शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ब्रिजलाल पालीवाल या रामभक्ताने श्रीरामाप्रती असलेल्या श्रद्धेपोटी राममंदिर बांधला. आमगावच्या राममंदिरातून सेठ ब्रिजलाल यांनी उभारलेला रामभक्तीचा सेतू आणखी घट्ट होऊन सूदूर प्रसिद्ध झालाय. त्यामुळे दरवर्षी रामनवमी निमित्त जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील रामभक्त रामजन्मोत्सवाला आमगाव येथे श्रीरामाचा जयजयकार करण्यासाठी येतात.
आमगावचे रहिवासी, श्रीराम मंदिर आमगाव ट्रस्टचे सदस्य तथा माजी जि. प. सदस्य वसंतराव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमगावच्या पूर्वेकडील घनदाट जंगलात राखडे महाराज यांचे वास्तव्य होते. ते सिद्धपुरुष होते. महाराजांची ख्याती खामखूरा (ता. अर्जुनी/मोरगाव, जि. गडचिरोली) येथील सेठ ब्रीजलाल पालीवाल यांच्यापर्यंत पोहचली. पालीवाल यांनी राखडे महाराज यांची आमगाव येथे भेट घेतली. पुढे राखडे महाराजांच्या सांगण्यानुसार पालीवाल यांनी आमगावचे तेव्हाचे मालगुजार केशवराव बुटी यांच्याकडून जमीन खरेदी करून महाराजांनी सांगितलेल्या त्या जागेवर राममंदिर बांधले.
सन 1890 ते 1895 च्या दरम्यान आमगावचे राममंदिर बांधण्यात आले असावे अशी माहिती मिळाली. राममंदिर बांधण्याकरिता बेल, चुना आणि रेती यांचे मिश्रण वापरण्यात आले. मंदिरात आज उभ्या असलेल्या राम, लक्ष्मण, सीता आणि बजरंगबली हनुमान यांच्या संगमरवरी दगडाच्या मूर्ती जयपूर (राजस्थान) वरुन आणल्या गेल्या. राखडे महाराजांनी मूर्ती प्रतिष्ठापना केली. त्यानंतर निरंतर श्रीराम नवमी जन्मोत्सव आणि श्रीमद भागवत सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. गुढीपाडव्यापासून गावात रामनामाचा गजर सुरू होतो. अख्खा आमगाव रामनामाच्या भक्तीत गुंग होतो. मोठ्या भक्तीभावाने संपूर्ण गावकरी राम जन्मोत्सव कार्यक्रमात सहभागी होतात. गावात उत्साहाचे वातावरण असते. रामनवमी निमित्त राममंदिर येथे भक्तांची मांदियाळी असते.
मारवाडी समाजाचे सेठ ब्रिजलाल पालीवाल यांनी राधेश्याम पालीवाल यांना दत्तक घेतले. आज राधेश्याम यांचे पुत्र उमेश राधेश्याम पालीवाल आणि त्यांच्या पत्नी ममता उमेश पालीवाल (बुटीबोरी, जि. नागपूर) दरवर्षी रामनवमी जन्मोत्सव कार्यक्रमाला आमगाव येथे येतात. मंदिरात पुजारी म्हणून चित्रकूट (मध्यप्रदेश) येथून आलेले तिवारी घराणे आजही ती जबाबदारी पार पाडत आहे. स्वामीदिन तिवारी, शिवसंपत तिवारी, राजविभुषन तिवारी आणि आता गीरजाशरन तिवारी पुजारी म्हणून काम पाहतात.
राममंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या उभ्या अतिशय देखण्या अशा मुर्त्या आहेत. राममंदिर बांधलेल्या जागेवर राखडे महाराज तपश्चर्या करायचे म्हणून ती जागा तपोभूमी असल्याचे ठाकरे म्हणाले. आमगावचे राममंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. आमगावचे राममंदिर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. लोकप्रतिनिधी आणि शासन-प्रशासन आणि अधिकारी तसेच गावकरी आणि रामभक्त यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आज राममंदिराचा विकास झाल्याचे दिसते.
सन 2009 पासून कलश कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात रामभक्त मंदिराच्या बाजूला असलेल्या एका खोलीत अखंडित दिवे पेटवून ठेवले जातात. आणि त्यांची पूजाअर्चा केली जाते. कोरोनाच्या काळात सामूहिक विवाह सोहळा खंडित झाला. मात्र भक्तीचा उत्साह कायम आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा