पंतप्रधानांचे लग्न सोडून राष्ट्रसंत आंधळीत

गावखेड्यातील जनकल्याणातून अख्ख्या राष्ट्र, जगाच्या समृद्धतेची व्यापक अशी कृतीयुक्त दूरदृष्टी बाळगणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आजपासून तब्बल 70 वर्षांपूर्वीच घनदाट अशा झाडीच्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या आंधळी गावात राष्ट्रसंत सतत सतरा वर्षे आले. राष्ट्रसंतांचे परमभक्त हरीराम खुणे यांच्याशी जुळलेल्या ऋणानुबंधापोटी राष्ट्रसंत आंधळी येथे येऊन भजन करायचे. आज सत्तर वर्षांनतरही आंधळी गाववासीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता दररोज स्मरण करून त्यांच्या विचारांची स्मृती निरंतर वाहतात.
              आईच्या गर्भात असतांनाच वडिलांचा मृत्यू झाल्याने वडिलांच्या प्रेमाला कायमचा मूकलेल्या आंधळी निवासी हरीराम खुणे यांचे बालपण बोळधा (बाराभाऊ) त गेले. तसेच शिक्षण ब्रम्हपुरी येथे झाले. हरीराम यांना गोड आवाज लाभल्याने ते भजन गायन उत्तम करायचे. त्याच अंगभूत गुणांनी राष्ट्रसंत यांच्याशी ओळख झाली. पुढे हीच ओळख इतकी घट्ट झाली कि हरीराम खुणे हे राष्ट्रसंत यांच्या भजनी मंडळात सहभागी झाले.
              राष्ट्रसंत सदैव स्वरचित भजनाचे गायन करूम जनप्रबोधन करत. आजपासून तब्बल सात दशकांपूर्वी आजच्यासारखी अतीवेगवान संपर्कसाधने, दळणवळणाच्या सुविधा नसतांना गडचिरोलीच्या जंगलात सती नदीकाठच्या आंधळी या गावी राष्ट्रसंत जवळपास दोन दशकभर आले. आंधळी गावात सती नदी आडवी यायची. पावसाला संपल्यावर महाराज यायचे. तेव्हा महाराज नदीच्या अलीकडे आपली गाडी ठेवायचे आणि गावातील नागरिक बैलजोडी जुंपलेल्या दमणीत बसवून नदीच्या पात्रातून राष्ट्रसंतांना गावात आणायचे. आज ज्या ठिकाणी श्री गुरुदेव सेवा मंडळ आंधळीचे प्रार्थना मंदिर आहे. त्याच्या अगदी बाजूला असलेल्या घराच्या जागेवर सर्वप्रथम आणि नंतर प्रार्थना मंदिराच्या जागेवरच गोळा झालेल्या हजारो नागरिकांना भजनातून आपला संदेश पोहचवत.
              राष्ट्रसंत आंधळी गावात दाखल होताच गावातील सर्वच नागरिक आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक आंधळीची वाट धरत. दिवाळी-दसऱ्याहून मोठ्या सण-उत्सवासारखी माहौल असायचा असे प्रत्यक्ष त्या क्षणाचे साक्षीदार असलेले गावकरी सांगतात. राष्ट्रसंत यांच्या विचार, भजन आणि स्मृतीचा सुगंध कायम पसरत राहावा म्हणून हरीराम खुणे यांनी गावात प्रार्थना मंदिर बांधले आहे. मंदिरात बसलेल्या अवस्थेतील राष्ट्रसंत यांची मूर्ती आहे. त्यादरम्यान हरीराम खुणे यांच्या घरी राष्ट्रसंत मुक्कामी असत. आजही खुणे यांच्या घरी महाराजांच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.मंदिराच्या समोरील जागेवर हरीराम खुणे यांची समाधी बांधली आहे.
             हरीराम खुणे नेहमी राष्ट्रसंत यांच्या समवेत असत. त्यावेळी राष्ट्रसंतांसोबत भ्रमण करत. एकदा नेपाळ देशाच्या दौऱ्यावर सुद्धा राष्ट्रसंत गेले असता हरीराम तिथे गेले होते. अरततोंडी (ता. कुरखेडा) येथील पहाडीवर राष्ट्रसंत यांचे भजन झाल्याचे प्रल्हाद खुणे यांनी सांगितले. राष्ट्रसंत शिस्तीचे काटेकोर पालन करत. रात्री एकदोन वाजतापर्यंत भजन कार्यक्रम चालायचे तरी अगदी वेळेवर दुसऱ्या दिवशी पुढील कार्यक्रमस्थळी रवाना होत.
             हरीराम खुणे यांचे पुत्र डॉ. चिंतेश्वर खुणे सांगतात कि एकदा महाराजांच्या भजन कार्यक्रमास वडसावरुन लाखांदूरला पायी चालत गेले. लाखांदूर येथे राष्ट्रसंत यांनी चिंतेश्वर यांना आपल्या कवेत घेत कवटाळून घेतले. हरीराम खुणे यांचे पुत्र प्रल्हाद खुणे यांनी राष्ट्रसंत यांच्यासोबत केलेल्या प्रवासातील आठवण आणि संवाद सांगितला. ब्रम्हपुरीत शिक्षण घेत असतांना एकदा राष्ट्रसंत यांचे महागाव (जि. गोंदिया) येथे कार्यक्रम होते. त्यासाठी ब्रम्हपुरीवरुन रेल्वेने वडेगाव रेल्वेस्टेशनपर्यंत प्रल्हाद राष्ट्रसंत यांच्यासोबत गेले. राष्ट्रसंत यांनी प्रल्हाद यांना आपल्या मांडीवर बसवले. आणि अत्यंत आस्थेने प्रल्हाद यास शिक्षण घेतल्यावर काय करशील? असा सवाल केला. त्यावर प्रल्हादने जनतेची सेवा करीन असे उत्तर दिले. हरीराम खुणे यांचे पुत्र सेवादास खुणे आज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीचे मध्यवर्ती प्रतिनिधी कलाकार आहेत. गडचिरोली जिल्हा प्रचार सेवाधीकारी प्रमुख आहेत. नामदेव खरवडे, मोतीराम सयाम, कवडु शेंदरे, पांडुरंग शहारे हि मंडळी आंधळी येथे सक्रिय होती.
             24 फेब्रुवारी 1968 या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र पंतप्रधान राजीव गांधी यांचे लग्न होते. त्या लग्नाची पत्रिका राष्ट्रसंत यांना सुध्दा प्राप्त झाली होती. मात्र आंधळी येथील कार्यक्रमाची तारीख आधीच घेतली असल्याने महाराजांनी लग्नाच्या दिवशी आंधळी येथे भजन कार्यक्रम केला. त्यावेळी लग्नाची पत्रिका सुद्धा राष्ट्रसंतांनी वाचून दाखवली आणि सांगितले कि मला जनतेची सेवा करायची आहे. म्हणून लग्न सोडून आंधळी येथे आलो.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी