40 वर्षांचा झाला विसोराचा तान्हा पोळा उत्सव
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वर्षातील एकमेव असा सण ज्यात बालकांच्या आनंद आणि सहभागाला सर्वोच्च स्थान असते. बैलाच्या भगीरथ कष्टाला पूजन करून प्राणी आणि मानवाच्या नातेसंबंधात अधिकचा जिव्हाळा निर्माण करण्याचे सण म्हणजे बैल पोळा आणि तान्हा पोळा सण. बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बालके लाकडी नंदी बैल सजवून त्याची पूजा करतात. आणि गावभर मिरवणूक काढतात. तान्हा पोळा सणाला बालकांकडून नंदी बैलाच्या निमित्त्याने बैलांची मनोभावे पूजन, वंदन, सन्मान केला जातो. केवळ तीन नंदी बैलांच्या साक्षीने आरंभलेला विसोरा गावचा तान्हा पोळा उत्सव आज (27 ऑगस्ट 2022) तब्बल 40 वर्षांचा झाला. गेली चार दशके पाहलेल्या विसोराच्या तान्हा पोळ्याने गावात बंधुता, एकात्मता आणि आपुलकीचा वसा जोपासला आहे.
विसोराचे रहिवासी माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुखदेव मुंडले यांनी आपल्या मुलाच्या हट्टाला होकार देत लव्हा वाघाडे गुरुजी, किसन राऊत, बक्षी गूरूनूले, मारोती सुंदरकर यांच्या सहकार्याने सन 1983 साली तान्हा पोळा उत्सव सुरू केला. फक्त तीन नंदी बैल सजवून तीन मुलांच्या आनंदात लव्हा गुरुजीचा आवाज त्याला बक्षी गूरूनूले यांनी दिलेला ढोलकीचा संगीत आणि आणखी चारपाच लोकांच्या उपस्थितीत मिरवणूक निघाली. गावतलावा शेजारील हनुमान मंदिरात पूजा झाली. हीच प्रथा दरवर्षी सुरू राहिली. तीनाचे आज तीनशेवर नदी बैल तान्हा पोळा उत्सवात येतात. गेल्या चाळीस वर्षांच्या इतिहासात सुखदेव मुंडले यांच्या निरंतर निश्चयाला बालकांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी सतत सहकार्य केले. त्याचमुळे आजही हा तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतो.
सन 2020 आणि सन 2021 या सलग दोन्ही वर्षी कोरोना लाटेच्या निर्बंधात तान्हा पोळा साजरा झाला. मागील दोन वर्षे बालकांना पाहिजे त्या मनमुराद आनंदात तान्हा पोळा उत्सवात सहभाग घेता आला नाही. आता दोन वर्षांच्या नंतर अगदी स्वतंत्र आणि मनमोकळ्या वातावरणात तान्हा पोळ्यात नंदी बैल आणता येणार आहे. कोरोनामुळे बालकांच्या उत्सवाला ग्रहण लागले होते. यंदा तान्हा पोळा उत्सवात गावातील बालके आपले सजवलेले नंदी बैल घेऊन उपस्थित असणार आहेत. आई, वडील, आजी, आजोबा असे कुटुंबातले सर्वच नातलग बालकांच्या सोहळ्याला हजेर राहणार.
सर्वप्रथम मुंडले यांच्या घरी पूजा झाल्यावर हनुमान मंदिराकडे टाळ, मृदंग, ढोलकीच्या तालावर भजन-गायनात मिरवणूक काढली जाते. हनुमान मंदिरात पूजा केल्यावर पुन्हा मिरवणूक जुन्या ग्रामपंचायत जवळ येते. आणि तिथे मान्यवरांच्या हस्ते तोरण तोडले जाते. शेवटी बालकांना आणि पालक, लोकांना प्रसाद दिली जाते. यावेळी बालकांना भेटवस्तू दिल्या जातात. विसोरा गावातील नागरिक, भजनी मंडळ उत्स्फूर्तपणे मदत करत असल्याने तान्हा पोळा उत्सव चाळीस वर्षांचा झाला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा