हरल्यामुळे अश्रू ढाळणारा बोंगा बैल
माणसामाणसांमध्ये असलेल्या खऱ्याखुऱ्या आणि जिवापाड प्रेमाची शोधाशोध चालली असतांना माणूस मात्र आपली माणूस जात सोडून इतर मुक्या जनावरांवर अस्सल स्नेह जपण्याचा जिवापाड प्रयत्न करतो. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तहसीलमधील कोकडी या खेडेगावात राहणारे मोहम्मद जमाल गनी शेख यांनी आपल्या घरी विकत घेऊन आणलेल्या लाडल्या बोंगा उर्फ टकली उर्फ गनी (बैल) ला इतक्या मायेच्या ओलाव्याने सांभाळले की याच तरूणपणातल्या बैलाने अजेय वृत्तीने पंचक्रोशीतील बैल शर्यती गाजवल्या. अखेर बैलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावरील प्रेमाखातर शेकडोंनी अंतिमविदाई देत त्याच्या कर्तृत्वाला सलाम केला. कोकडी येथे वास्तव्यास असलेल्या मोहम्मद जमाल गनी शेख यांना शंकरपटाची मोठी हौस. याच हौसेने त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील चिखलगाव येथून वासरू घेऊन आणला. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नंतर हाच बैल दोन दाती पण शिंग नसलेला म्हणून बोंगा आणि काही दिवसांत आलेले शिंग आखूड पण वक्र असल्यामुळे टकळी तर मालकाचे आडनाव गनी त्यामुळे गनी अशा तीन नावांनी ओळखला गेला. आपल्या मुलाबाळांव...